वृत्तकथा - ऑपरेशन मरिन ड्राइव्ह

नवी दिल्ली. गुरुवार, ९ मे २०१३.
दिल्लीतल्या पॉश लोधी कॉलनीतील पोलिसांच्या स्पेशल सेलचं काम नेहमीप्रमाणेच सुरू होतं. नेहमीप्रमाणे सकाळी इन्स्पेक्टर बद्रीश दत्त कार्यालयात आले. आपल्या टीममधील सहका-यांशी त्यांनी चर्चा केली. चर्चा अर्थातच गेल्या अनेक दिवसांपासून चाललेल्या बड्या ऑपरेशनची होती. ५ मेचा जयपूरमधला पुणे वॉरियर्स आणि राजस्थान रॉयल्समधला सामना फिक्स होता, हे आता स्पष्टच झालं होतं. त्याच सामन्यादरम्यान एक बुकी आणि एक क्रिकेटपटू यांच्यात झालेलं दूरध्वनी संभाषण बद्रीश दत्त यांच्या टीमने मध्येच पकडलं होतं – इंटरसेप्ट केलं होतं. आता एफआयआर दाखल करणं आवश्यकच होतं. दत्त यांच्या सहका-यांचं मत तसंच पडलं. अखेर दुपारी बाराच्या सुमारास दत्त यांनी काही अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केला. -

एप्रिल २०१३च्या तिस-या आठवड्यात मिळालेल्या गुप्त खबरीनुसार, इंडियन प्रीमिअर लीगच्या सध्या सुरू असलेल्या सामन्यांमध्ये एक प्रकारची फिक्सिंग होत आहे आणि त्यात अंडरवर्ल्डचे काही सदस्य सहभागी आहेत. दिल्लीतील काही अज्ञात दलालांचाही त्यात सक्रीय सहभाग आहे….
... यातून असेही उघडकीस आले आहे, की आयपीएलच्या प्रायोजकांनी आपापल्या संघासाठी मोठी रक्कम देऊन अलीकडेच ज्यांना खरेदी केले आहे अशा क्रिकेटपटूंनी, या खेळावर बेकायदेशीर सट्टेबाजी करणा-या अनेक बुकींसाठी, काही सामन्यांत ठरवून खेळ करावा आणि वरकमाईची संधी साधावी म्हणून हे दलाल त्या क्रिकेटपटूंशी संपर्क साधत आहेत....... या परिस्थितीत त्यांच्याविरुद्ध भारतीय दंडसंहितेच्या कलम १२० ब आणि ४२० अन्वये गुन्हा दाखल होऊ शकतो. कृपया, त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करावा आणि त्याची चौकशी खाली सही केलेल्या व्यक्तींकडे सोपवावी.
गुन्ह्याची तारीख आणि वेळ : एप्रिल २०१३ पासून.
रुक्का (सूचना) देण्याची वेळ : ०९.०५.२०१३, दुपारी १२.०५.

गुन्हा दाखल झाल्यानंतर आता खरी कामाला सुरूवात होणार होती. एप्रिलच्या तिस-या आठवड्यात हाती आलेल्या माहितीवरून बद्रिश दत्त आणि त्यांच्या टीमने एका प्रचंड मोठ्या प्रकरणाला हात घातला होता.  दिल्ली, मुंबई, कोलकत्ता, चेन्नई, बंगळुरू, जयपूर, अहमदाबाद... फार काय, नाशिक, पुण्यासारख्या शहरांपासून, दुबई, पाकिस्तानपर्यंत या प्रकरणाची पाळंमुळं पसरलेली होती. अनेक संभावित धेंडं त्यात अडकलेली होती. हे साधं प्रकरण नव्हतं. ते विषारी सापाचं बिळ होतं. बद्रीश दत्त यांना त्याचा अनुभव... जीवघेणा अनुभव येणार होता. आज मात्र ते पूर्ण बेसावध होते. एफआयआर दाखल केल्याच्या समाधानात होते.

नवी दिल्ली. शुक्रवार, १० मे २०१३.
कालच्या गुरुवारी मोहालीत किंग्ज इलेव्हन पंजाब आणि राजस्थान रॉयल्समध्ये झालेला सामनाही फिक्स झाल होता. ही माहिती बद्रीश दत्त यांना एफआयआर दाखल केल्यानंतर काही वेळानेच मिळाली होती. आता थांबून चालणार नव्हते.
दिवसभर ते त्याच विचारात होते. आपले सहकारी कैलाश बिश्त यांच्याशी त्यांनी पुढील कारवाईबद्दल चर्चा केली आणि रात्री ते दोघेही विशेष पोलिस आयुक्त (स्पेशल सेल) एस. एन. श्रीवास्तव यांना भेटायला गेले. श्रीवास्तव यांच्या केबीनमध्येच त्यांची बैठक झाली. स्पेशल सेलचे पोलिस उपायुक्त संजीव यादव हेही तिथं होते. दिल्ली आणि गुरगावमध्ये छापे मारावेत असं त्या बैठकीत ठरलं. त्यानंतर बद्रीश दत्त रात्री त्यांच्या घरी गेले. उद्याचा दिवस त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाचा होता. एप्रिलच्या तिस-या आठवड्यात सुरू झालेल्या तपासाचा पुढचा अध्याय त्या दिवशी लिहिला जाणार होता.

खरंतर दिल्ली पोलिसांना अगदी योगायोगानं या प्रकरणाचा सुगावा लागला होता. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलमधील अधिकारी सांगतात - तो मार्चचा महिना होता. स्पेशल सेलमध्ये नेहमीप्रमाणे फोन इंटरसेप्ट करणं सुरू होतं. स्पेशल सेलमध्ये बद्रीश दत्त हे या कामातले तञ्ज्ञ मानले जात. त्या दिवशी अचानक त्यांचं लक्ष दुबईतून कराचीला करण्यात आलेल्या एका फोनकडे गेलं. ते फोन दहशतवाद्यांचे असावेत. सांकेतिक भाषेत ते बोलत असावेत, असं त्यांना वाटलं. ते सावध झाले. पण नंतर त्यात वेगळीच डाळ शिजत असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. पण ती डाळ नेमकी कोणती आहे हे लक्षात येण्यास मात्र एप्रिल महिना उजाडावा लागला.   

स्पेशल सेलमधून आता दुबई आणि कराचीतील माफियांच्या दूरध्वनींवर खासकरून लक्ष ठेवण्यात येत होतं. तशातच बद्रीश यांच्या कानी सुनील दुबई या बड्या माफिया गुंडाने भारतातील आपल्या एका कॉन्टॅक्टला – बहुधा चंद्रेश या बुकीला केलेलं दूरध्वनी संभाषण पडलं. कुणा नदीम सैफी अख्तर याच्या हत्येबद्दल त्यांचं बोलणं सुरू होतं.     

नदीम सैफी अख्तर म्हणजे नदीम-श्रवण जोडीतला संगीतकार. त्याच्यावर गुलशनकुमार यांच्या हत्येचा आरोप होता. २००३ मध्ये तो त्यातून पुराव्याअभावी सुटला. तेव्हापासून तो लंडनमध्येच असतो. दाऊद इब्राहीमचा भाऊ अनीस याचा त्याच्यावर जुना राग आहे. त्याच्यामुळेच अबू सालेम पोलिसांच्या तावडीत सापडल्याचा अनीसचा संशय आहे. सुनील दुबई हा या अनीसचा उजवा हात. दाऊदच्या टोळीचा परदेशातील बांधकाम व्यवसाय, तसेच खंडणीखोरी आणि बेटिंग-जुगाराचा व्यवसाय तो सांभाळतो. त्याचं ते दूरध्वनी संभाषण ऐकल्यानंतर स्पेशल सेलने ताबडतोब इंटेलिजन्स ब्युरोलासुद्धा त्याची कल्पना दिली. पण आता स्पेशल सेललाही हे सगळं प्रकरण भलतंच सुरस वाटू लागलं होतं. त्यामुळे त्यांनीही मुंबईतील अंडरवर्ल्डच्या हालचालींवर, त्यांच्या दूरध्वनी संभाषणांवर नजर ठेवणं सुरूच ठेवलं.

त्या संभाषणांत सतत आयपीएल, भाई, पैसे, बुकी आणि टार्गेट असे शब्द येत असत. तेव्हा सुरुवातीला पोलिसांना असं वाटलं, की अंडरवर्ल्ड काही तरी मोठा धमाका करण्याच्या तयारीत आहे. एक अधिकारी सांगतो, की भारतातला एखादा स्लीपर सेल गर्दीच्या ठिकाणी हल्ला करण्यासाठी पैशांची मागणी करीत आहे, असं त्यांना त्या बोलण्यातून वाटलं. पण ते शेकडो तासांचं संभाषणांचं रेकॉर्डिंग ऐकल्यानंतर स्पेशल सेलमधील अधिका-यांच्या लक्षात आलं, की हे दुसरं तिसरं काही नाही, तर आंतरराष्ट्रीय बेटिंग आणि फिक्सिंगचं प्रकरण आहे.

दत्त यांनी आपल्या वरिष्ठांना त्याची माहिती दिली. त्यानंतर सुमारे ७० फोनवर लक्ष ठेवण्यात आलं. त्यात काही खेळाडू आणि बुकी यांच्या फोनचीही समावेश होता. गुजरातमधला एक बुकी दुबई आणि दिल्लीतल्या त्याच्या कॉन्टॅक्टला सतत फोन करीत असे. त्याचे फोन टॅप करीत असताना दत्त यांच्या कानी ज्युपिटर हे सांकेतिक नाव पडलं. त्यांना हेही समजलं, की हे दिल्लीतल्या एका बुकीचं नाव आहे आणि त्याचे राजस्थानशी संबंध आहेत. त्यावरून त्याची चौकशी सुरू झाली आणि समजलं, की या बुकींचे राजस्थान रॉयल्समधल्या काही खेळाडूंशी संबंध आहेत. त्यांपैकी अजित चंडिला या खेळाडूच्या फोनवर सगळ्यात आधी पाळत ठेवण्यात आली होती.

९ मेचा मोहालीतला सामना फिक्स असल्याची माहितीही अशाच एका दूरध्वनी संभाषणातून दत्त यांना मिळाली होती. जिजू जनार्दन आणि चांद नावाच्या एका बुकीदरम्यान त्या सामन्याआधी हे संभाषण झालं होतं. जिजू जनार्दन हा पूर्वी गुजरातमधला क्रिकेटपटू. केरळच्या २५ वर्षांखालील संघातून तो खेळला होता. एस. श्रीशांतचा तो जानी दोस्त. काहींच्या मते तो त्याचा नातेवाईकही आहे. त्याचं आणि चांदचं दिल्ली पोलिसांनी ध्वनिमुद्रीत केलेलं हे संभाषण श्रीशांतचा स्पॉट फिक्सिंगमधील सहभाग स्पष्ट करण्यास पुरेसं होतं. –
चांद : सिग्नल काय असेल?
जिजू : मी त्याला सांगितलं आहे. तो कोणतीही वेगळी गोष्ट करणार नाही. दुसरी ओव्हर टाकण्यापूर्वी तो त्याचा टॉवेल कमरेला खोचेल.चांग : भाई, प्लीज त्याला सांग, की ओव्हर सुरु करण्याआधी आम्हांला थोडा वेळ दे. म्हणजे आम्ही आमचं बुकींग सुरू करू शकू.
 यानंतरच ११ मे रोजी छापे टाकायचे असं दिल्ली पोलिसांनी ठरवलं आणि बद्रीश दत्त रात्री घरी गेले...
ते न परतण्यासाठीच.


गुरगाव. शनिवार, ११ मे २०१३.
बद्रीश दत्त. वय ४५. दिल्ली पोलिस दलातले जाँबाज इन्स्पेक्टर. अव्वल दर्जाचे निशाणेबाज. फोन इंटरसेप्शनमधले तञ्ज्ञ. अनेक दहशतवादी, गुंडांना गजाआड करणारे, संसद हल्ला, अँसल प्लाझा, बटला हाऊस येथील चकमकींत सहभागी झालेले निडर अधिकारी. आज ते क्रिकेटला काळीमा लावणा-या खेळाडू आणि बुकींना गजाआड करणार होते. त्यासाठी त्यांची टीम सज्ज झाली होती. परंतु सकाळचे ११ वाजले तरी ते लोधी कॉलनीतल्या आपल्या कार्यालयात पोचले नव्हते. त्यांचे सहकारी सकाळपासून त्यांना वारंवार मोबाईलवर कॉल करत होते. पण ते फोनही उचलत नव्हते. काय झालंय काहीच कळत नव्हतं. अखेर त्यांच्या सहकारी अधिका-यांनी ठरवलं, की त्यांच्या घरी जाऊन काय ते पाहायचं.

गुरगाव सेक्टर ५२मधल्या आरडी सिटी या उच्चभ्रू वसाहतीतील फ्लॅट क्र. १७ सी मध्ये गेल्या वर्षभरापासून ते राहात असत. पोलिस अधिकारी तिथं पोचले, तेव्हा दत्त यांची मोलकरीण दरवाजाची बेल वाजवत होती. बराच वेळ झाला तरी आतून काहीही उत्तर येत नसल्याने तीही काळजीत पडली होती. अखेर पोलिसांनी दरवाजा तोडला. त्यांनी फ्लॅटच्या लॉबीत प्रवेश केला आणि पाहतात तो आतमध्ये बद्रीश दत्त आणि त्यांची मैत्रीण गीता शर्मा यांचे मृतदेह पडलेले. दोघांच्याही मस्तकात गोळ्या घालण्यात आल्या होत्या. बद्रीश दत्त यांनी गीता शर्माची हत्या करून आत्महत्या केली होती, की तिने त्यांची हत्या करून नंतर स्वतःलाही संपवलं होतं? दिल्ली पोलिसांच्या मते बद्रीश यांनी त्या महिलेची हत्या करून आत्महत्या केली होती. पण आता या सा-याच प्रकरणाभोवती संशयाचं धुकं निर्माण झालेलं आहे.

गेल्या वर्षभरापासून आपल्या पत्नीपासून दूर या सुंदर महिलेसोबत बद्रीश राहात होते. तो फ्लॅट तिच्याच मालकीचा होता. ती घटस्फोटित होती. खासगी गुप्तचर संस्था चालवत होती आणि अलीकडेच तिला फसवणुकीच्या एका प्रकरणात गुन्हे विभागाच्या खंडणीविरोधी पथकाने अटक केली होती. गृहमंत्रालय आणि गुप्तचर अधिका-यांच्या बनावट लेटरपॅडचा वापर केल्याचा आरोप तिच्यावर होता. २१ दिवसांच्या कैदेतून ती आठवड्यापूर्वीच सुटून आली होती. अशा महिलेबरोबर बद्रीश दत्त यांचे संबंध असावेत, हेही संशयास्पद होतं.
मुळात गीता शर्मा नेमकी कोण होती, हेच अजून अंधारात आहे. ती मुळची मुंबईची असल्याचं सांगण्यात येतं. पण त्याबद्दल नेमकी माहिती अजूनही कोणाला नाही. ती अंडरवर्ल्डची खबरी असावी, असा पोलिसांना संशय आहे. पण त्याबद्दलही नेमके धागेदोरे अजून पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत.

गीता शर्माचा फ्लॅट ज्या गुरगावमध्ये होता, तिथल्या सहारा मॉलमध्ये आयपीएल फिक्सिंगबाबतच्या काही बैठका झाल्या होत्या. बद्रीश दत्त त्याचीही खोलात जाऊन चौकशी करीत होते. या सगळ्या चौकशीतून त्यांच्या हाती अशी काही माहिती तर लागली नव्हती ना, की त्यामुळे दुबईतले डॉन अस्वस्थ झाले होते? दिल्ली पोलिस दलातील सूत्रांनुसार, याचाही तपास सुरू आहे. बद्रीश दत्त यांच्या पत्नीने तर सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. अर्थात चौकशीतून बाहेर येतं ते सत्यच असतं, असं काही म्हणता येत नाही. तेव्हा आता बद्रीश दत्त यांच्या मृत्यूचं गूढ असंच कायम राहणार आहे. त्यांच्या मृत्यूचा आयपीएल फिक्सिंगशी काही संबंध आहे की नाही, हे कदाचित असंच पडद्याआड राहणार आहे.

मुंबई. मंगळवार, १४ मे २०१३.
दिल्ली पोलिस आयपीएलमधील सट्टेबाजी आणि फिक्सिंगचा तपास करीत असताना, मुंबई पोलिसांचाही स्वतंत्ररीत्या तपास सुरूच होता.
गेल्या सात-आठ दिवसांपासून मुंबई पोलिसांची गुन्हे शाखा रमेश व्यास नावाच्या बुकीच्या मागावर होती. ५२ वर्षांचा व्यास हा नेपियन सी रोडचा रहिवासी. त्याचा मिठाईचा व्यवसायही आहे. काळबादेवीतल्या दादीसेठ अग्यारी लेनमधल्या लालवाणी मॅन्शनमधील एका फ्लॅटमधून तो बेटिंगचा धंदा करीत होता. त्याचा सुगावा लागताच गुन्हे शाखेने त्याला मंगळवारी उचलायचं ठरवलं. गुन्हे शाखेच्या मालमत्ता विभागाचे प्रमुख इन्स्पेक्टर नंदकुमार गोपले, गुन्हे गुप्तचर विभागाचे प्रमुख इन्स्पेक्टर शशांक सांडभोर आणि अजय सावंत यांच्या पथकाने मंगळवारी रात्री व्यासच्या कार्यालयावर छापा मारला. व्यासबरोबरच त्याचे दोन साथीदार – पांडुरंग कदम आणि अशोक व्यास यांनाही अटक करण्यात आली.
व्यासकडे सापडलेल्या ९० मोबाईल फोनपैकी ३० फोनवर कॉन्फरन्स कॉलची सोय होती. त्यावरून तो देशातील आणि परदेशातील बुकींना एकमेकांशी संपर्क करून देत असे. त्याच्या अटकेने बुकींना धक्का बसलाच. पण दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेललाही मोठा धक्का बसला. व्यासच्या अटकेने सगळं बेटिंग आणि फिक्सिंग विश्व जागं होऊन दिल्ली पोलिसांच्या आजवरच्या मेहनतीवर पाणी पडण्याची भीती निर्माण झाली होती. ते टाळण्यासाठी आता तत्परतेने कारवाई करणं दिल्ली पोलिसांसाठी आवश्यक बनलं होतं. 


दिल्ली. बुधवार, १५ मे २०१३. दुपार.
 इन्स्पेक्टर बद्रीश दत्त यांच्या मृत्यूने आयपीएल बेटिंग-फिक्सिंगचा तपास मागे पडेल असं कोणाला, कदाचित दुबईतल्या माफिया गुंडांना वाटलं असेलही. पण दत्त यांनी सुरू केलेली तपासाची चक्रं आता थांबूच शकत नव्हती. ती थांबलीही नाहीत. व्यासच्या अटकेनेही त्यात अटकाव आला नाही. बुधवारी दुपारी ३ वाजून २७ मिनिटांनी दिल्ली पोलिसांच्या हाती मानन नावाचा बुकी आणि अपोझिट (बहुधा अंडरवर्ल्डच्या संपर्कात असलेला बुकी) यांचं दूरध्वनी संभाषण लागलं. - 
मानन : आप अहमदाबाद जाने के लिए फटाफट निकलो.अपोझिट : क्यूं?
मानन : अंकित का काम हो गया है. अभी सेलिब्रेशन जारी है. पहले उसने नही कहा था लेकीन अजीत ने उसे अच्छी तरह समझा दिया. रेडी कर दिया. अब वह हजार टका करेगा. कोई सिग्नल नहीं.अपोझिट : किस ओव्हर में?
मानन : सेकंड ओव्हर में १२ प्लस रन देगा. १४ प्लस नही.
बुधवारी रात्री मुंबईतल्या वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातल्या सामन्यासाठी हे स्पॉट फिक्सिंग ठरलं होते. आता दिल्ली पोलिसांना एवढंच पाहायचं होतं, की या संभाषणात ठरल्यानुसार अंकित चव्हाण खेळतो की नाही?
पण दिल्ली पोलिस तेवढंच पाहणार नव्हते. व्यासच्या अटकेमुळे सगळंच बिनसण्याच्या आधीच त्यांना कारवाई करणं आवश्यक बनलेलं होतं. त्या कारवाईसाठी १९ अधिका-यांचं एक पथक आधीच मुंबईला रवाना करण्यात आलं होतं. त्यांना एवढंच सांगण्यात आलं होतं, की मरिन ड्राईव्हवर एनसीपीएच्या समोर असलेल्या यू-टर्नवर सगळ्यांनी बुधवारी रात्री जमा व्हायचं आहे. अधिक त्यांना काहीही सांगण्यात आलं नव्हतं. फार काय, त्या गोपनीय कारवाईला नावसुद्धा तेच देण्यात आलं होतं – ऑपरेशन मरिन ड्राईव्ह- यू टर्न.

मुंबई. बुधवार, १५ मे २०१३. रात्र.
दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलचे दहा-बारा अधिकारी लवकरच मुंबईत येऊन दाखल झाले होते. बाकीचे रात्री ९ पर्यंत मरिन ड्राईव्हवर पोचले होते. आपल्याला काही बड्या बुकींना पकडायचं आहे, असं त्यांना सांगण्यात आलं. अजूनही श्रीशांत, अंकित आणि अजित यांच्या अटकेची योजना गोपनीयच ठेवण्यात आली होती.
वानखेडेवर मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्सचा सामना आता सुरु झाला होता. त्यात अंकित काय करतो हे पाहण्यासाठी स्पेशल सेलचे काही अधिकारी स्टेडियममध्ये जाऊन बसले होते. पथकातले इतर सदस्य मरिन ड्राईव्हवर भाड्याने घेतलेल्या इनोव्हामध्ये पुढच्या आदेशाची वाट पाहात बसले होते.  
अंकितने आपल्या दुस-या षटकात बुकींशी ठरल्याप्रमाणे धावा दिल्या. पोलिसांना अपेक्षित होतं तसंच घडलं. त्यांनी लगेचच दिल्लीत वरिष्ठांना फोन लावला.
दिल्लीतून कारवाईला हिरवा कंदिल मिळाला. स्पेशल सेलच्या अधिका-यांनी आवश्यक त्या औपचारिक बाबींची पूर्तता केली. दिल्लीहून आलेल्या पथकाच्या तीन तुकड्या करण्यात आल्या. एक तुकडी वांद्र्याला जाणार होती. दुसरी हॉटेल ट्रायडंटकडे आणि तिसरी तुकडी मात्र दक्षिण मुंबईत थांबणार होती.  
वानखेडेवरील सामना संपला. हळूहळू प्रेक्षकांची गर्दी ओसरू लागली. रात्री ११ वाजून ४० मिनिटांनी श्रीशांत आणि अंकीत एका कारमधून स्टेडियमच्या बाहेर पडले. वांद्र्यातील एका पॉश पबकडे ते निघाले होते.  
दिल्ली पोलिसांचं एक पथक त्यांच्या मागावरच होतं. मरिन ड्राइव्हच्या यू टर्नवरून त्यांनी श्रीशांतच्या गाडीचा पाठलाग सुरू केला.
... आणि भारतीय क्रिकेट रसिकांना हादरवून सोडणा-या एका थरारक अटकनाट्याला सुरुवात झाली.
तेव्हा बुधवारी रात्रीचे बारा वाजून गेले होते.

मुंबई. बुधवार, १५ मे २०१३. मध्यरात्रीनंतर.
ओआर-जी. उच्चार : ऑर्जी. अर्थ : सामुहिक लैंगिक क्रिया.
पश्चिम वांद्र्यातील एका पबचं हे नाव. या अश्लील नावाला कोणी आक्षेप घेऊ नये म्हणून कागदपत्रांत मात्र ते ओरिजनल गुरमे असं नोंदविण्यात आलेलं आहे. उच्चभ्रू धनिक-वणिकांची बाळं आणि बाळ्या, माफिया गुंड, काळ्या धंदेवाले यांचं हे रात्र धुंदीत घालवण्याचं ठिकाण.
श्रीशांत आणि अंकीत हे मात्र आज येथे मौजमजा करण्यासाठी चाललेले नव्हते. तशी श्रीशांतला नाच-गाण्यांची, तरुण मुलींची भलतीच आवड. पण आज त्यांना येथे एका बुकीला भेटायचे होते. मिठानिया असं त्याचं नाव.
ते दोघे पबमध्ये आले तेव्हा रात्री सव्वाबारा वाजले होते. दोघेही सरळ आत, मिठानियाला भेटण्यासाठी गेले. त्यांच्या मागोमाग साध्या वेशातले दोन पोलिसही आत गेले. पथकातले बाकीचे सहा पोलिस बाहेरच त्यांची थांबले. पण त्यांना फार काळ वाट पाहावी लागली नाही.
अर्ध्या तासाने, पाऊणच्या सुमारास अंकीत एकटाच पबबाहेर पडला. एका कारमधून तो हॉटेल ट्रायडन्टकडे निघाला. त्याबरोबर पोलिसांच्या एका गाडीने त्याचा पाठलाग सुरू केला. हॉटेलमध्ये आपल्या खोलीत जाऊन अंकीत सरळ झोपला. पोलिसांनी नंतर त्याला त्याच्या खोलीतून अटक केली.

इकडे श्रीशांत अजूनही मिठानियाशी गप्पा मारत पबमध्येच बसलेला होता. साधारण दीडच्या सुमारास श्रीशांत बाहेर पडला. त्याच्यासोबत त्यावेळी तीन तरूणी होत्या. ते सगळे एका कारमध्ये बसले आणि वांद्र्यातील वॉटरफिल्ड रोडच्या दिशेने गेले. कुणाला संशय येऊ नये म्हणून मिठानिया त्यानंतर जवळजवळ २० मिनिटे पबमध्येच थांबला. नंतर तोही एका
कारमधून निघून गेला. रात्री अडीचच्या सुमारास लिंकिंग रोडवर त्याला अटक करण्यात आली.

पोलिसांची एक गाडी श्रीशांतच्या कारचा पाठलाग करीत होती. वॉटरफिल्ड रोडवरील रॉयल्टी क्लबजवळ श्रीशांतने त्याची कार थांबवली. चित्रपट तारे-तारकांचा, धनाढ्यांच्या मुलाबाळांचा हा आवडता क्लब. तेथे जरा वेळ थांबल्यानंतर श्रीशांत आपल्या तीन मैत्रिणींसह पुन्हा कारमध्ये बसला. त्यांची गाडी आता कार्टर रोडवर आली होती. १.४५ वाजता पोलिसांच्या गाडीने त्याच्या कारला ओव्हरटेक केलं. गाडी आडवी लावली. श्रीशांतला काय चाललंय हे समजण्याच्या आतच एक पोलिस अधिकारी खाली उतरला. त्याने श्रीशांतला आपलं ओळखपत्र दाखवलं.
तुला आमच्याबरोबर यावं लागेल, तो अधिकारी म्हणाला.
त्यावर श्रीशांत वैतागला. मी येणार नाही, म्हणाला. पण अखेर तो तयार झाला. पोलिसांच्या गाडीत बसल्यानंतर त्याला हळुहळू परिस्थितीची जाणीव होऊ लागली. काहीतरी बिघडलंय, हे त्याच्या लक्षात आलं. अशी वेळ आली की सगळेच व्हाइट कॉलर गुन्हेगार हमखास एक गोष्ट करतात. आपल्या बड्या बड्या ओळखींचा हवाला पोलिसांना देतात. श्रीशांतनेही तेच केलं.
आपला मोबाईल बाहेर काढून एका अधिका-याला तो म्हणाला, तुम्हांला मला अटक करायचीय ना? पण त्या आधी तुम्ही केरळच्या किंवा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना फोन करा.
पण पोलिसांनी त्याच्या या बडबडीकडं अजिबात लक्ष दिलं नाही. त्यांची गाडी आता पुन्हा एकदा मरिन ड्राइव्हच्या दिशेने भरधाव निघाली होती. भारतीय क्रिकेटमधला एक स्टार दोन्ही हातांत आपलं डोकं धरून त्यांच्या गाडीत बसलेला होता.
हरभजनने एकदा श्रीशांतच्या श्रीमुखात थप्पड दिली होती. नंतर लोक ते विसरूनही गेले होते. पोलिसांनी मात्र त्याच्या सगळ्या करिअरला, आजवर कमावलेल्या कीर्तीलाच जोरदार थप्पड दिली होती. ही थप्पड मात्र आता कधीच विसरली जाणार नव्हती.
श्रीशांत आणि अजितला स्पॉट फिक्सिंगच्या जाळ्यात ज्याने खेचलं तो अजित चंडिला मात्र अजूनही मोकळाच होता. हॉटेल इंटरकॉन्टिनेन्टलमध्ये आपल्या खोलीत तो होता. पोलिसांनी पहाटे त्याला तेथून अटक केली.
श्रीशांत, अंकित चव्हाण आणि अजित चंडिला या तिघांबरोबरच ११ बुकींचीही धरपकड करण्यात आली होती.
क्रिकेटचा काळा चेहरा उजेडात आणून ती लांबलचक रात्र आता संपली होती.
आता थोड्याच वेळात माध्यमांचा, ब्रेकिंग न्यूजचा, क्रिकेटमधील स्फोटांचा दिवस सुरू होणार होता...(मुंबई व दिल्ली पोलिसांतील सूत्रांनी माध्यमांना दिलेल्या माहितीवरून.)

Read more...

No comments: