नवं पुस्तक - रॉ : भारतीय गुप्तचरसंस्थेची गूढगाथा




हे पुस्तक लिहिण्यामागील (दुसरे) कारण होते ते गेल्या काही वर्षांत सातत्याने दिसून येत असलेली आपल्याच नजिकच्या इतिहासाबद्दलची दुर्भावना. आपल्या देशात स्वातंत्र्यानंतरच्या सत्तर वर्षांत काहीच झाले नाहीहे पालुपद सातत्याने कानावर पडत होते. अजूनही पडते. या काहीच झाले नाहीच्या शेरेबाजीमध्ये अर्थातच देशाच्या पाकिस्तानविषयक धोरणांचाही समावेश असतो. आपल्या आंतरराष्ट्रीय धोरणांविषयी तिरस्काराची भावना असते त्यात. हे सारेच निसंशय प्रचारकी आहे. खेद याचाकी अनेकांची त्यावर श्रद्धा आहे. आपण देशाच्या संरक्षणात कमी पडलोविशेषतः पाकिस्तानपुढे आपण नेहमीच मान तुकवलीशांततावादाने दुबळे केले आपल्याला... हा प्रचार अनेकांना खराच वाटत असतो. ही सर्व टीका काँग्रेसविरोधातील आहे अशी त्यांची भाबडी समजूत असते. वस्तुतः त्या टीका आणि आरोपांतून आपण आपल्याच देशवासीयांनी केलेल्या कामाला बट्टा लावत असतो. आपल्यासमोर हिंदुस्थानच्या फाळणीचा इतिहास सतत उभा केला जातो. परंतु त्यानंतर आपण पाकिस्तानची फाळणी केली हे मात्र कोणाच्याही ध्यानीमनी नसते. आपल्यासमोर पंजाब आणि काश्मीर येथील दहशतवाद असतो. पाकिस्तानात फुटत असलेले बॉम्ब आणि तेथील विविध प्रांतातील स्वतंत्रतावादी चळवळी यांची मात्र आपल्याला माहिती नसते. आपल्या सामर्थ्याबाबत एवढा शंकेखोर असलेला देश जगाच्या पाठीवर दुसरा कोणता नसेल. या शंकांमधून राजकीय लाभ मिळत असेल कोणाला. परंतु त्यातून देशाविषयी विकृत न्यूनगंड निर्माण होत होता......तो न्यूनगंडत्या शंका परास्त करण्यासाठी रॉसारख्या संस्थांचा इतिहास समोर येणे आवश्यक होते. त्याबाबत इंग्रजीत अलीकडच्या काही वर्षांत पाच-सहा पुस्तके प्रसिद्ध झाली. रॉशी संबंधित असलेल्या अधिका-यांनीच ती लिहिलेली असल्याने त्यांचे मूल्य मोठेच आहे. परंतु एकतर ती संख्या फारच कमी आहे आणि दुसरी बाब म्हणजे काही अपवाद वगळता रॉच्या कारवायांचा एकत्रित इतिहास त्यातून अभावानेच मिळतो. मराठीतून तर तसे लेखनच झालेले नाही. ती कमतरता या पुस्तकातून भरून निघेल असे वाटते...  
 ('मनोगत' मधून.) 

- रवि आमले, मनोविकास प्रकाशन, डिसेंबर २०१८, पाने २९३, किंमत - २९९ रु. 


रॉ पोस्ट्स
(रॉ आणि गुप्तचर यंत्रणा या संदर्भात यापूर्वी लिहिलेले लेख - 

१. हेरस्य कथा रम्यः (सकाळ)

२. रॉ फाईल (लोकसत्ता)

३. रॉ मटेरियल - पडद्यामागचे राजकारण समजून घेण्यासाठी (लोकसत्ता)

४. रॉ आणि पाकिस्तान (लोकसत्ता)

५. काळोखातल्या झुंजारकथा (लोकसत्ता-लोकरंग)

६. पाकिस्तानी पाखंड (लोकसत्ता)

७. दोन हेरांच्या गप्पा... (लोकसत्ता)

८. अजित डोभाल : भारताचे जेम्स बॉण्ड... सुपर स्पाय, इ. इ. (अक्षरनामा)

९. मिशेल नावाचा 'चॉपर' (सकाळ)



Read more...

संतांची फॅक्टरी


Populus vult decipi – ergo decipiatur.t 
(लोकांना स्वत:ला फसवून घ्यायचे असते, म्हणून ते फसले जातात. एक लॅटिन वचन.) 

कोणत्याही राष्ट्राला जगण्यासाठी उद्योगधंदे वगैरे उभारावेच लागतात. व्हॅटिकन हे जगातील सर्वात लहान राष्ट्र. तेथे असे उद्योगधंदे नाहीत. त्यामुळे बहुधा त्यांनी तेथे संतांचे कारखाने काढले आहेत. धर्म हे सार्वकालीन चलनी नाणे आहेच. त्यात हे उत्पादन. या जोरावर व्हॅटिकनचा जागतिक संसार छान चालतो. अलीकडच्या काळात व्हॅटिकनचा हा संतनिर्मितीचा उद्योग चांगलाच वाढल्याचा दिसतो. आकडेवारीत सांगायचे, तर १९७८ ला पोपपदी आलेल्या जॉन पॉल दुसरे यांनी तब्बल ४८२ जणांना संतपद बहाल केले. सध्याचे पोप फ्रान्सिस यांनी तो विक्रम मोडण्याचा चंग बांधल्याचे दिसते. त्यांनी आल्या आल्या ८१३ जणांना घाऊकपणे संतपदी नेऊन बसविले आणि आता भारतरत्न मदर तेरेसा यांचा संतपदाचा मार्ग मोकळा केला आहे.

Read more...

चला, संशयात्मा होऊया..

‘अत्यंत असत्य अशी गोष्ट तुम्ही सातत्याने सांगत राहिलात की हळुहळू लोकांना ती खरी वाटू लागते. लोकांचा त्यावर विश्वास बसतो.’ 
हिटलरचा प्रोपागंडा मंत्री जोसेफ गोबेल्स याचे हे विधान. अनेक ग्रंथांतूनही ते त्याच्या नावावर उद्धृत करण्यात आले आहे. या विधानाची मौज अशी की त्याला हेच विधान तंतोतंत लागू पडते! म्हणजे – गोबेल्सच्या नावावर खपविण्यात येणारे हे विधान त्याचे नाही. मिशिगनमधल्या केविन कॉलेजचे प्रो. रँडल बेटवर्क हे नाझी प्रोपागंडाचे अभ्यासक. त्या विषयावरचे अनेक ग्रंथ त्यांच्या नावावर आहेत. त्यांच्या संशोधनाचा हा निष्कर्ष.

अशा अनेक गोष्टी सांगता येतील. उदाहरणार्थ न्यूटन आणि सफरचंदाची गोष्ट.

Read more...

मस्तानीची बदनामी : एक माजघरी कारस्थान!


बाजीराव-मस्तानी या चित्रपटातील पिंगा गाणे हे इतिहासाला धरून नसल्याने त्याविरोधात गेल्या महिन्यात संतापाची लाट निर्माण झाली. सर्वांचे म्हणणे एकच होते, की इतिहासाचा विपर्यास सहन केला जाणार नाही, करता कामा नये. ही एक चांगलीच गोष्ट झाली. इतिहासाशी वृथा खेळ नको असा आग्रह धरला जाणे ही नक्कीच अभिनंदनीय बाब आहे. असा आग्रह धरल्यामुळे आणखी एक झाले. ते फारसे कुणाच्या लक्षात आलेले दिसत नाही, पण पुराव्यांनिशी इतिहास जे सांगतो ते आणि तेवढेच मान्य करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांच्या अंगावर आली.

काशीबाई ही पेशव्यांची पत्नी. तशात ती एका पायाने अधू. त्यात पुन्हा तो काळ. सोवळ्या ओवळ्याचा, पडदागोशाचा. तेव्हा काशीबाई काही अशा नाचणार नाहीत. असे जे म्हटले जाते ते खरेच आहे. पण हे म्हणताना मस्तानीही तशी नाचणार नाही हेही जाणून घेण्याची जबाबदारी आपल्यावर आली आहे. ती पेलायची तर त्याकरीता मस्तानी कोण होती येथून सुरूवात करावी लागणार आहे. त्यासाठी गंभीर साधनांद्वारे इतिहास समजावून घ्यावा लागणार आहे. मनावरील कादंबरीमय इतिहासाची आणि ऐकीव आख्यायिकांची भूल उतरवून फेकावी लागणार आहे. खरा तोच इतिहास दाखवा असे संजय लीला भन्साळीला बजावताना खरा तो इतिहास जाणून घेण्याचे शिवधनुष्य उचलावे लागणार आहे. शिवाय हे केवळ तेवढ्यावरच भागणारे नाही. आपल्यासमोर जो इतिहास पुराव्यांच्या पायावर सध्या उभा आहे तो पचविण्याची कुवत आपल्याला दाखवावी लागणार आहे. अशी ताकद खरोखरच आपल्यात आहे का?


Read more...

निमित्त मस्तानी


मस्तानीबाबत तर तिच्या हयातीतच अनेक कंड्या पिकविण्यात आल्या होत्या. ती राजकन्या. पण तिला वेश्या ठरवले गेले. ती मुस्लिम नव्हे. ती प्रणामी पंथाची. पण तिला मुस्लिम ठरविण्यात आले. तो पेशवाईतील एका मोठ्या कटाचा भाग होता आणि त्यात बाजीरावांच्या मातोश्री, बंधु चिमाजी आप्पा आणि पुत्र नानासाहेब यांचा हात होता. हा कट एवढा किळसवाणा होता, की त्यात मस्तानीचे नानासाहेबांबरोबर म्हणजे तिच्या मुलाबरोबरच प्रेमसंबंध असल्याचे दाखवून तिचा काटा काढण्याचाही प्रयत्न झाला होता. आज हा कट काळाच्या पडद्याआड गेला आहे आणि मस्तानीची कलावंतीण म्हणून प्रतिमा तेवढीच शिल्लक उरली आहे....

Read more...