मोठे प्रभावशाली व्यक्तिमत्त्व आहे त्याचे. अंगी वक्तृत्त्वकला आहे. धार्मिक ग्रंथांचे उत्तम वाचन आहे. चांगली स्मरणशक्ती आहे. धूसर धार्मिक संकल्पनांची पेरणी करून बोलतो असे, की ऐकणाऱ्यास काहीही समजले नाही, तरी वाटावे, की मोक्षच गावला. एका प्रवचनात तो म्हणाला होता, ‘मी इज ओन्ली सिटिंग ॲज मी इन यू. धिस टू ओन्ली टॉकिंग टू इच अनादर… सो द मी रिसाईड्स ऑल ऑफ दॅट ॲज मी. सो दॅट मी थ्रू धीस मी, टॉकिंग टू मी.’ काय समजले? पुलंच्या ‘असा मी असामी’तल्या धोंडोपंताना भेटलेला ‘रॅवरंड गुरूद्येवा संप्रभवानंदास्वामी’ याचा हा आधुनिक अवतारच म्हणायचा. पुन्हा बेमालूम थापा मारण्यात प्रवीण. अंगातील वस्त्रांचा रंग तेवढा त्यागाचा. बाकी राहतो राजासारखा. बसतो चांदीच्या सिंहासनावर. मस्तकी भरजरी शिरस्राण. गळ्यात सोन्याचे मोठेमोठे हार. सत्संगाला येतो तेही राजेशाही मिरवणुकीने. मागेपुढे अब्दागिऱ्या, ललकाऱ्या, ढोल-नगारे. दाक्षिणात्य पौराणिक चित्रपटांत राजगुरू वगैरे असतात तसे ते सगळे. या अशा चमचमाटाने डोळे दीपतात लोकांचे. तोच त्याचा उद्देश असतो. पूर्वी मात्र असे नव्हते.
बिडदी येथे त्याने नवा नवा आश्रम स्थापन केला होता तेव्हाची गोष्ट. मोजकेच शिष्य सोबत असायचे. आजुबाजूच्या गावांतून भाविक मंडळी सत्संगास यायची. त्यातले काही लोक आश्रमात श्रमदान करायची. माणसे श्रद्धाळू असतात. त्यांना वाटायचे, हे देवाचे काम. ते केले, तर आपल्या खाती थोडे पुण्य तरी जमा होईल. अशा माणसांमध्ये नित्यानंद जाणीवपूर्वक कोणताही बडेजाव न करता वावरायचा. मोठ्या माणसांनी आपण छोटे आहोत असे म्हटले, की ते लोकांना भावते. तो माणूस त्यांना अधिक मोठा वाटू लागतो. नित्यानंद त्या लोकांची विचारपूस करायचा. त्यांच्यात बसून जेवायचा. त्या वेळी त्याची वृद्ध माता - लोकनायकी - ही आश्रमात राहात असे. ती माता कधी कधी पंगतीत जेवण वाढण्याचे काम करायची. साध्या गोष्टी. लोकांना त्या आवडतात. त्या काळात त्याला पाहिलेली एक वृद्धा सांगते, ‘त्यांना पाहून वाटायचे साक्षात देवाचा अवतार आहे. साध्या दहा बाय दहाच्या खोलीत राहायचे. खोलीत फक्त एक टेबलफॅन. साधी शाल असायची अंगावर तेव्हा. सोन्याचे दागिने नसायचे.’ कुठून असणार? तोवर भोळ्याभाबड्या भक्तांचा दानयज्ञ सुरू झालेला नव्हता. त्याच्या या दागिन्यांची मोठी चर्चा असायची.
आता कोणी म्हणेल, की संन्यासाला कशाला हवेत सोन्याचे दागिने? कोणास येथे ‘सोने नाणे आम्हां मृत्तिकेसमान’ म्हणणारे तुकोबा आठवतील. पण तुकाराम महाराज ‘संत’ होते. नित्यानंदांसारख्या बाबांची भौतिक सुखांकडे पाहण्याची दृष्टी निराळी. आणि त्यांना धार्मिकतेचा वर्ख चढवण्याची चलाखीही आगळी. एका मुलाखतीत नित्यानंदने या दागिन्यांबाबत स्पष्टिकरण दिले होते. त्याचे म्हणणे असे, की ‘आगमात सदाशिवाने ३२ प्रकारचे दागिने घालण्यास सांगितले आहे. म्हणून मी घालतो. मला सोन्यात रस नाही. पण सदाशिवाने सांगितलेय, की रुद्राक्ष हे नेहमी सोन्याच्या आवरणात घालावेत. सोने हा आध्यात्मिक धातू आहे.’ एवढेच नव्हे, तर ‘सोने हे प्रोग्राम्ड करता येते. ते आपला विचारांचा करंट, ऊर्जेचा करंट धरू शकते आणि तेच पुन्हा प्रक्षेपित करते.’ आपल्या कोणत्याही कृतीला, गोष्टीला धार्मिकतेचे आणि वैज्ञानिक परिभाषेचे आवरण चढवण्याचे या लोकांचे कसब नावाजावे तेवढे थोडे.
अनेक धार्मिक बाबा-बुवांच्या विचारांत हा एक विरोधाभास प्रकर्षाने दिसून येतो. एकीकडे आधुनिक विज्ञान-तंत्रज्ञानामुळे निर्माण झालेल्या सर्व सुविधा आणि उपकरणांचा वापर करणारे हे लोक, दुसरीकडे त्याच विज्ञान-तंत्रज्ञानावर सतत टीका करताना दिसतात. एकीकडे पाश्चात्य संस्कृतीला नावे ठेवणारे हे लोक, दुसरीकडे त्याच पाश्चात्यांची प्रमाणपत्रे मिरवताना दिसतात. विज्ञानाबाबत बोलताना या मंडळींचे नेहमीचे पालुपद हेच असते, की हे सारे वैज्ञानिक शोध आमच्या ऋषीमुनींनी पूर्वीच लावून ठेवलेले आहेत. नित्यानंदही हेच सांगतो. त्याचे म्हणणे असे, की वेदांमध्ये जे ज्ञान आहे ते आता कुठे आधुनिक विज्ञानाला कळू लागलेले आहे. आमच्या ऋषींनी धर्मग्रंथांतून जी सत्ये लिहून ठेवली आहेत, त्यांचाच शोध आता हे विज्ञान लावत आहे. हे सांगताना, विज्ञानातील संकल्पनांचा आधार घेऊन आपल्या तथाकथित चमत्कारी शक्तींचा प्रचार करणे यात काही विरोधाभास आहे हे त्याच्या गावीही नसते. ‘कॉंटम एंटॅंगलमेन्ट’ नामक एक शास्त्रीय संकल्पना आहे. इलेक्ट्रॉन, प्रोटॉन्स यांत ती दिसते. एकात बदल झाला, की दुसरा सूक्ष्म कण त्याला प्रतिसाद देतो, अशी ही साधारण संकल्पना. तिच्या आधारे नित्यानंद सांगतो, की मी माझ्या मेंदूत जो विचार करतो, तो न सांगताही शिष्यांद्वारे प्रत्यक्षात उतरतो. आणि, त्याचा दावा असा, की हे त्याने ‘शास्त्रीय’ प्रयोगातून ‘सिद्ध’ करून दाखवले आहे. या अशा शास्त्रीय प्रयोगांच्या बऱ्याच नोंदी त्याच्या संकेतस्थळावर आहेत. उदाहरणार्थ ‘नित्यानंदपीडिया’वरची ही नोंद. तिचे शीर्षक - ‘द माईंड ऑफ ए मिस्टिक’.
या नोंदीनुसार, ओक्लाहोमामधील ‘जेम्स एल. हॉल, ज्यु. सेंटर फॉर माईंड, बॉडी अँड स्पिरिट’ या संस्थेचे सहसंस्थापक आणि अध्यक्ष डॉ. आर. मुरली कृष्णन यांनी नित्यानंदवर एक प्रयोग केला. त्याचे ‘न्युरोइमेजिंग’ केले. त्यात दिसले, की नित्यानंद त्याच्या इच्छेनुसार मेंदूतील प्रभावशाली भागाचे ९० टक्के कार्य थांबवू शकतात. त्याच प्रमाणे ते खोल समाधीत गेले असता, त्यांच्या मेंदूचा विशिष्ट भाग प्रदीप्त झाल्याचे दिसले. डॉ. आर. मुरली कृष्णन यांचे म्हणणे असे, की ज्याला तिसरा डोळा म्हणतात, साधारणतः तोच हा भाग. या प्रयोगानंतर नित्यानंदला जेव्हा विचारले, की मेंदूचा तो भाग प्रदीप्त झाला होता, तेव्हा तुम्ही काय करीत होता? तो म्हणाला, ‘मी तिसरा डोळा उघडत होतो.’ हे ‘संशोधन’ आपल्याला दिसते ते केवळ नित्यानंदच्या संकेतस्थळावर. वस्तुतः कोणतेही संशोधन, त्याचे निष्कर्ष तेव्हाच मान्य केले जातात, जेव्हा त्यांस त्या क्षेत्रातील तज्ज्ञांची मान्यता मिळते. ‘पीअर रिव्ह्यू’ म्हणतात त्याला. नित्यानंदच्या कोणत्याही प्रयोगाला अशी मान्यता मिळालेली नाही. पण हल्ली असे संशोधन प्रसिद्ध करणाऱ्या पत्रिका पायलीला पन्नास झाल्यात. पैसे फेकले, की हवे ते छापून येते. अशी असंख्य बनावट संशोधने इंटरनेटवर दिसतील. आपापल्या अनुयायांना उल्लू बनवण्यासाठी ती उपयुक्त ठरतात. यांची आणि ‘मॅग्नेटिक गाद्या’ विकून आजार बरे करणारे, गोमुत्राने कर्करोग ठीक होतो वगैरे सांगणारे ‘वैज्ञानिक’ आणि त्यांचे संशोधन यांची जातकुळी एकच. छद्मविज्ञानाचा वापर करून सामान्य जनतेला मूर्ख बनवण्याचे हे प्रकार. नित्यानंदने हेच केले. त्याने मग ‘तिसरा डोळा’ उघडून देण्याच्या कार्यशाळांचा धंदा सुरू केला.
पौराणिक कथांनुसार, भगवान शंकरास तिसरा डोळा आहे. तो उघडल्यास त्यातील अग्नीने संपूर्ण विश्वाचा नाश ठरलेला. नित्यानंदला हे अमान्य. त्याच्या मते, तिसरा डोळा ही नैसर्गिक अतिमानवी शक्ती. ती सर्व मनुष्यमात्रांत असते. हा डोळा उघडल्यास तुम्ही सर्व विश्व जाणू शकता. हा डोळा कुठे असतो? तर भुवयांच्या मध्ये, नाकाच्या वर. अर्थात तो हे इतक्या साध्या भाषेत सांगत नसतो. तसे सांगितले, तर त्यावर कोण श्रद्धा ठेवणार? तेव्हा मग त्यात येतात आगम, कुंडलिनी, चक्रं, आज्ञा, आत्मज्ञान अशा संज्ञा, संकल्पना. त्यांचा असा भोवरा निर्माण केला जातो, की त्यात भलेभले भेलकांडून जावेत. बाबा-बापूंचे हे हातखंडा तंत्र. ही तिसरा डोळा उघडल्यानंतर काय होते? तुमची दृष्टी सुधारते. चष्मा लागत नाही. फार काय, तुम्ही डोळे झाकून पाहू शकता. तुमची नजर एक्स-रे सारखी होते. इतरांच्या शरीरातील आजार, विकार तुम्हाला दिसू शकतात. नित्यानंद, त्याचे अनुयायी आणि त्याचे राजीव मल्होत्रा यांच्यासारखे आनंददूत यांचे सांगणे असे, की हे सारे वैज्ञानिक प्रयोगांनी ‘सिद्ध’ झाले आहे. याद्वारे अंध मुलेही पाहू शकतात.
राजीव मल्होत्रा हे हिंदुत्त्ववाद्यांचे थोर विचारवंत. हिंदू धर्माविरोधात जागतिक पातळीवर मोठे षड्यंत्र रचण्यात आलेले आहे, वगैरे त्यांची मते हिंदुत्त्ववाद्यांत अतिलोकप्रिय आहेत. जुलै २०१६मध्ये त्यांनी ‘कंपनी का माल है, कंपनी का प्रचार है’ थाटात त्रिनेत्र जागृतीचे ‘फेसबुक लाईव्ह’ केले. त्या प्रात्यक्षिकात नित्यानंदच्या गुरुकुलातील एका मुलाने केवळ डोळ्यांनी या मल्होत्रांचे ‘बॉडी स्कॅन’ केले आणि सांगितले, की त्यांना पाठीचा त्रास आणि मधुमेह आहे. ६६ वर्षे वय होते तेव्हा मल्होत्रांचे. अशा वृद्धास असे आजार आहेत, हे त्या मुलाने ‘शोधले’. ही मुले डोळे झाकून वाचू शकतात हेही लोकांना दाखवण्यात आले. अशी प्रात्यक्षिके अगदी अमेरिकेतही करून दाखवण्यात आली. त्यावर काही लोकांनी शंका घेतली. आपल्याकडे डोळे झाकून सायकल चालवणे वगैरे जादूचे प्रयोग लोकांनी अनुभवलेले. तेव्हा त्याची खिल्ली उडवण्यात आली. त्यावर मल्होत्रा म्हणाले, की ‘काही लोकांना तर्कशुद्ध वैज्ञानिक दृष्टी नसते. त्यांना हिंदू धर्म हा विनोद वाटतो.’ एखाद्या भोंदू बाबावरच्या टीकेचे रुपांतर संपूर्ण हिंदू धर्मावरील टीकेत करणे हाही ‘चमत्कार’च. पण तो सर्रास केला जातो.
नित्यानंदने या त्रिनेत्र जागृतीचे ‘कोर्स’ सुरू केले. भरमसाठ शुल्क मोजून अनेक पालक आपल्या मुलांना या शिबिरांमध्ये पाठवत होते. हे काही नवे नाही. तिकडे रशिया आणि युरोपात व्हॅचेस्लाव्ह एम. ब्रोनिकोव्ह नामक व्यक्ती १९९४ पासून अशाच प्रकारे लोकांमधील तिसरा डोळा उघडत होती. त्याला तो ‘एक्स-रे आय’ म्हणायचा. त्यासाठी अध्यात्मिक ऐवजी, संगणकीय शब्दावली वापरायचा, इतकेच. त्याची चलाखी डेरेन ब्राऊन या ‘मेंटॅलिस्ट’ जादूगाराने उघडकीस आणली. तिनेत्र जागृतीचे पितळ उघडे पाडले कर्नाटकातील बुद्धिवादी कार्यकर्ते प्रो. नरेंद्र नायक यांनी. त्यांनी प्रात्यक्षिकाद्वारे दाखवून दिले, की तो सारा हातचलाखीचा - खरे तर नेत्रचलाखीचा - प्रकार आहे. डोळ्यांवर बांधलेल्या पट्टीखाली असलेल्या फटीतून कसे पाहायचे ते त्या लहान मुलांना शिकवले जायचे. त्यात काहीही गैर नाही, हे त्यांच्या मनावर बिंबवले जायचे. ती मुले मानसिक दबावाखाली येऊन आणि काही जण त्यातून प्राप्त होणारे कौतुक पाहून तो प्रकार करायची. शिक्षणक्षेत्रात काम करणारा आनंद श्रीनिवास हा यूट्यूबर सांगतो, त्याच्याकडे अशी काही मुले आली होती. डोळ्यांवर पट्टी बांधून वाचायची ती. तेव्हा त्याने एकच गोष्ट केली. खोलीतील दिवे विझवले. अंधारात वाचा म्हणाला. नाही जमले त्यांना. सारा लँड्री ही एकेकाळची नित्यानंदांची लाडकी शिष्या. तिनेही नंतर याचा पर्दाफाश केला. पण श्रद्धा ही गोष्ट फार चिवट. ती एखाद्याच्या चरणी अर्पण केली, की मग त्या बाबा-बुवा-बापू आणि मातांनी कितीही महापापे करोत, ते पुण्यशीलच वाटत राहतात. नित्यानंदच्या शिष्यगणांचे, अनुयायांचे हेच झाले होते. त्यांची नित्यानंदवरील श्रद्धा किती चिकट होती, ते दिसले त्याच्या सेक्स-सीडी प्रकरणातून.
०००
शयनगृहातील मंचकावर निजलेला नित्यानंद आणि त्याच्या समवेत असलेली दाक्षिणात्य अभिनेत्री रंजिता यांच्या लीलांची ती चित्रफीत. ‘सन टीव्ही’ने २ मार्च २०१० रोजी त्या चित्रफितीचे काही तुकडे प्रक्षेपित केले. ती बातमी म्हणजे नित्यानंदच्या साम्राज्यावर पडलेला बॉम्ब होता. प्रचंड खळबळ माजली त्याने. एका क्षणात नित्यानंदच्या प्रतिमेचे तुकडे झाले. ते अर्थात सामान्य प्रेक्षकांच्या मनात. एखाद्याने अचानक कानशिलावर मारले, की जसे सन्न होते, तसे नित्यानंदच्या भगतगणांचे झाले. ती त्यांची पहिली प्रतिक्रिया. दुसरी प्रतिक्रिया होती ती अविश्वासाची. तोवर नित्यानंद आणि मंडळींकडून ‘तो मी नव्हेच’चे प्रयोग सुरू झाले. सीडी बनावट आहे, मॉर्फ आहे, वगैरे. सरकारपासून मिशनऱ्यांपर्यंत सर्वांवर खापर फोडण्यात आले. त्याचे शिष्य आरोप करणाऱ्यांवर, मीडियावर तुटून पडू लागले. राजीव मल्होत्रांसारख्या नित्यानंदप्रेमींना यात जागतिक पातळीवरचे षड्यंत्र दिसू लागले. प्रश्न आला, की ते चित्रिकरण नेमके केले कोणी?
ते केले होते आरती राव आणि नित्या धर्मानंद ऊर्फ लेनीन करुप्पन यांनी. आरती राव ही नित्यानंदच्या आतल्या वर्तुळातील शिष्या. आणि करुप्पन हा त्याचा विश्वासु सेवक. आश्रमाच्या प्रकाशन विभागाची जबाबदारी होती त्याच्यावर. कीटकनाशकांचा व्यवसाय होता त्याचा. २००४मध्ये नित्यानंदच्या संपर्कात आला. संन्यास घेतला. नित्यानंद म्हणाला, संन्याशाने सर्वसंगपरित्याग करायचा. याने आपली मालमत्ता, कार सारे आश्रमाच्या नावावर केले. पण २००९च्या सुमारास त्याला नित्यानंद विषयी संशय येऊ लागला. तो सांगतो, विनय भारद्वाज नावाचा एक आश्रमवासी होता. त्याने माहिती दिली, की नित्यानंदने त्याच्याशी लैंगिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला. करुप्पनच्या विश्वासाच्या ठिकऱ्या उडाल्या. याच आश्रमात त्याला आरती राव भेटली. ती अमेरिकेतली. मिशिगनमध्ये घर होते. यांत्रिकी अभियांत्रिकीत पदव्युत्तर शिक्षण झालेले. चांगली नोकरी होती. कौटुंबीक समस्यांमुळे ती नवऱ्याला सोडून २००४ मध्ये आश्रमात आली. ३० वर्षे वय होते तिचे तेव्हा. नित्यानंदने तिलाही आपल्या आतल्या वर्तुळात घेतले. तिला वैयक्तिक सचिवपद दिले. एकदा करूप्पनने या आरतीला विश्वासात घेतले. तेव्हा तिने तिच्याशी नित्यानंदने लैंगिक संबंध प्रस्थापित केल्याचे सांगितले. करुप्पनचा आरोप असा, की नित्यानंदने आश्रमातील अनेकींचा गैरफायदा घेतला होता. त्या दोघांनी मग योजना आखली आणि नित्यानंदच्या शयनगृहात गुपचूप कॅमेरा ठेवला.
काही दिवसांनी, एप्रिल २०१०मध्ये आरतीने नित्यानंदविरोधात बलात्काराची तक्रारही नोंदवली. या प्रकरणात त्याला अटक झाली. ११ जूनला जामिनावर सुटला. नित्यानंदच्या शिष्यांनी सुरु केले, की ती आरोप करणारी बाई ही पूर्वजन्मातील राक्षसी आहे. तिला लैंगिक आजार आहेत. एड्स आहेत. ‘हार्पिस आरती’ असे नामकरण केले त्यांनी तिचे. पण आता नित्यानंदचे एकेक कारनामे उजेडात येऊ लागले होते. त्याच्याविरोधात जनक्षोभ वाढत चालला होता. तशात मार्च २०१२मध्ये त्याच्या आश्रमात पोलिसांना गांजा व कंडोमचा साठा आढळला. आणि काही कागदपत्रेही. ती होती गोपनियतेविषयीची करारपत्रे. ‘नॉन-डिस्क्लोजर कॉंट्रॅक्ट’. २००५मधली. आश्रमातील ‘लर्निंग फ्रॉम द मास्टर प्रोग्राम’मध्ये सहभागी होणाऱ्या लोकांकडून ती भरून घेतली जात. त्याच्या पुरवणी करारात स्पष्ट म्हटले होते, की या कार्यक्रमात तांत्रिक पूजा केल्या जातील आणि त्याबाबत कोणालाही, खासकरून नित्यानंदला जबाबदार धरता येणार नाही. पुढच्या कलमात (क्र. ए-३) म्हटले होते, की या प्रोग्राममध्ये स्त्री-पुरूषांच्या उन्मादाशी संबंधित प्राचीन तांत्रिक गुह्यगोष्टी असू शकतील. त्यात अध्यात्मिक संबंधाकरीता लैंगिक ऊर्जेचा वापर असू शकेल. त्यात नग्नता, लैंगिक क्रिया, जवळचे शारिर संबंध असे असू शकेल. या कराराद्वारे ‘स्वयंसेवकां’नी हा प्रोग्राम बिनशर्त मान्य करायचा होता. या गौप्यस्फोटाने नित्यानंदचे उपक्रम काय होते, हे स्पष्ट झाले. प्रकरण न्यायालयात गेले. नित्यानंदची ती सीडी बनावट नव्हती. त्यात तो आणि ती सिनेअभिनेत्री होते, हे बंगळुरूच्या ‘फॉरेन्सिक सायन्सेस लॅबोरेटरी’ने स्पष्ट केले. पण हळुहळू याच्या बातम्या कमी कमी होऊ लागल्या. लोकस्मृती लघु असते. त्यामुळे हे प्रकरण निवळते की काय असे वाटत असतानाच, ऑक्टोबर २०१९ मध्ये गुजरातमधून एक सनसनाटी बातमी आली…
जनार्दन शर्मा हा नित्यानंदचा परमभक्त. त्याला चार अपत्ये. लोपामुद्रा, नंदिता, कल्पलता आणि अंबासुतन. या चारही मुलींवर उत्तम धार्मिक संस्कार व्हावेत या हेतूने त्याने त्यांना बिडदीतील गुरूकुलमध्ये ठेवले होते. तेथे लोपामुद्रा (२१ वर्षे) आणि नंदिता (१८ वर्षे) यांनी बारावीपर्यंत शिक्षण घेतले. एके दिवशी जनार्दन शर्माला समजले, की त्याच्या चारही मुलांना अहमदाबादला हलवण्यात आले आहे. तेथे हिरापूरमधील ‘दिल्ली पब्लिक स्कूल’च्या प्रांगणात नित्यानंदचे योगिनी सर्वज्ञपीठम आहे. हे समजल्यावर शर्मा यांची पत्नी तेथे ५ ऑक्टोबर रोजी मुलांना भेटण्यासाठी गेली. तर आश्रमाच्या प्रशासनाने काही केल्या तिला मुलांना भेटू दिले नाही. ती पुन्हा १ नोव्हेंबरला गेली. तेव्हाही तेच. अखेर तिने पोलिसांत तक्रार दिली. त्यावेळी त्यांना त्यांच्या दोन अल्पवयीन मुली सोपवण्यात आल्या. पण लोपामुद्रा आणि नंदिता. त्यांचे तोंडही पाहू दिले नाही. आश्रम प्रशासनाचे म्हणणे असे, की त्या मुली सज्ञान आहेत. स्वखुशीने येथे राहात आहेत. वृत्तवाहिन्यांनी हे प्रकरण लावून धरले. अहमदाबाद पोलिसांनी तक्रार नोंदवून घेतली. ती तारीख होती १७ नोव्हें. २०१९. जनक्षोभ आता वाढत चालला होता. त्याच्या अटकेची मागणी जोर धरू लागली होती. आणि पाचच दिवसांनी, २२ नोव्हेंबर रोजी गुजरात पोलिसांनी जाहीर केले - नित्यानंद पळाला.
अहमदाबाद पोलिस १७ नोव्हेंबर रोजी सांगत होते, की ‘नित्यानंदकडे पासपोर्ट नाही. असेल तर तो मुदतबाह्य झालाय. आम्ही इमिग्रेशनला लेखी कळवले आहे.’ आणि तरीही नित्यानंद देशाबाहेर पळून जाऊ शकला. याबाबतचा एक सिद्धांत असा, की तो नेपाळला गेला. तेथून बनावट पारपत्राद्वारे परदेशात गेला. हाती पैसे असले, राजकीय व प्रशासकीय ‘कॉन्टॅक्ट्स’ असली, की या गोष्टी सहजसोप्या असतात. पण तो गेला कुठे? त्याबाबतही अनेक अटकळी. कोणी म्हणतो, दक्षिण अमेरिकेतील इक्वोडोरमध्ये. कोणाच्या मते, कॅरेबियनमधील त्रिनिदाद आणि टोबॅगोमध्ये. जगभरात आपल्या गुप्तचरसंस्थांचे जाळे पसरलेले आहे. पण (असे सांगितले जाते, की) आजही हा फरारी इसम नेमका कुठे आहे ते आपल्याला माहीत नाही. आपल्याला एवढेच माहीत आहे, की या नित्यानंदने कैलास नावाचा एक स्वतंत्र देश स्थापन केला आहे. तोही पलायनानंतर अवघ्या दहा-बारा दिवसांत.
०००
कैलास ही नेमकी काय भानगड आहे? नित्यानंद सांगतो - हा मुळात प्राचीन देश आहे. आपण त्याचे फक्त पुनरुज्जीवन केले. आंतरराष्ट्रीय कायद्यांनुसार हा सार्वभौम देश आहे. ते कसे मिळाले? प्राचीन काळी तीन हिंदू राज्ये होती. सूर्यवंश सुरंगी साम्राज्यम सर्वज्ञानपीठ, सुवर्णपीठ स्वर्गपुर साम्राज्य सर्वज्ञानपीठ आणि श्यामला पीठ सर्वज्ञानपीठम. शिवाय कांची कैलास सर्वज्ञानपीठम आणि १७ सार्वभौम ऐतिहासिक धर्मसंस्था या सगळ्यांना संयुक्त राष्ट्रांची व्हिएन्ना करारानुसार मान्यता आहे. आणि या सर्व साम्राज्यांचा वारसदार आहे स्वामी नित्यानंद परमशिवम्. हा कैलास देश हिंदू धर्माच्या पुनरुज्जीवनाचे आणि रक्षणाचे काम करणार. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे या देशाला संयुक्त राष्ट्रांनी मान्यता दिलेली आहे. ही कैलासच्या अधिकृत संकेतस्थळावरील माहिती. तद्दन दिशाभूल करणारी. धादांत खोटी. संयुक्त राष्ट्रांनी या देशाला मान्यता दिलेली नाही. त्यामुळे कैलासची घटना, सरकार, त्यांचा ध्वज आणि चलन, पासपोर्ट, व्हिसा हा साराच भातुकलीचा खेळ ठरतो.
मुळात या देशाला जगाच्या पाठीवर कुठेही स्थान नाही. भूमी नाही. नकाशात नोंद नाही. तो ‘कैलासवासी’ नित्यानंद आणि त्याचे शिष्य कुठे तरी लपून बसलेले आहेत. तेथून ते हा आभासी देश चालवत आहेत. मधूनच संयुक्त राष्ट्रांना कुठलासा मानवाधिकार वगैरे विषयांवरचा अहवाल पाठवतात. आणि सांगतात, की मिळाली मान्यता. कुठे तरी अमेरिकेतील एखाद्या महापौराला भेटण्यासाठी आपले शिष्य पाठवतात. आणि सांगतात, की मिळाली मान्यता. मध्यंतरी या लोकांनी नेवार्कच्या महापौराला बनवून ‘सिस्टर सिटी’ करार केला. बोंबाबोंब झाल्यावर नेवार्कने तो रद्द केला. या नित्यानंदकडे पैसा मुबलक येतो. अमेरिकेतील विविध शहरांत त्याने ‘एनजीओ’ स्थापन केलेल्या आहेत. हाँगकाँगमध्ये ‘कैलासा लिमिटेड’ नावाची खासगी कंपनी नोंदवली आहे. या धनशक्तीच्या जोरावर त्याच्या अनुयायांनी बोलिव्हियातील अमेझॉनच्या जंगलातील आदिवासींची, नवी दिल्लीच्या तिप्पट आकाराची जमीन दोन लाख डॉलर किमतीला हजार वर्षांच्या भाडेकराराने घेण्याचा प्रयत्न केला होता. एका वृत्तपत्राने ते उघडकीस आणले. या ‘जमीन तस्करी’प्रकरणी नित्यानंदच्या २० शिष्यांना अटक झाली. अशा प्रकारे जगभरात नाचक्की होऊनही नित्यानंदचा बनवाबनवीचा खेळ मात्र अबाधित सुरू आहे. त्याला नवनवे शिष्य मिळत आहेत. जुने अनुयायी अजूनही त्याला सदाशिवाचा अवतार मानत आहेत. अर्थात हे केवळ नित्यानंदच्याच बाबतीत दिसते असे नाही. आशूमल हरपलानी उर्फ आसाराम, नारायण साई, फलाहारी बाबा, रामपाल, गुरूमीत रामरहीमसिंग यांच्याही शिष्यांच्या मते हे बाबा दोषी नाहीत. त्यांना षड्यंत्र करून अडकवलेले आहे. नित्यानंदवर तर (वर जे उल्लेखलेले आहेत ते) केवळ आरोपच आहेत. त्याने ते नाकारले आहेत. त्याचे म्हणणे, की हा त्याच्या आणि हिंदू धर्माविरोधातला कट आहे. बलात्काराच्या आरोपावर त्याचा खुलासा असा, की ‘मी ना पुरूष आहे, ना स्त्री. मी सामान्य मानव नाही. माझ्या देहात जैविक आणि मानसिक म्युटेशन झाले आहे. तेव्हा ते जे आरोप आहेत, ती कृती मी करूच शकत नाही… मला लैंगिक वासना नाही.’ त्याच्या अनुयायांची यावर श्रद्धा आहे. या श्रद्धेला मरण नसते.
पुण्यप्राप्ती, मनशांती, समस्यांपासून सुटका, आत्मशोध, मोक्षप्राप्ती… माणसे नाना कारणांनी बाबा-बुवांकडे जातात. नित्यानंदकडे अशाच कारणांमुळे लोक ओढले जात आहेत. आणि एकदा त्याच्या छायेत लोक आले, की त्यांना अडकवण्याची अनेक तंत्रे त्याच्याकडे आहेत. अमेरिकन समाजशास्त्रज्ञ डॉ. जंजा ललिच या ‘कल्ट’ या विषयातील अधिकारी. त्या सांगतात - करिष्माई नेतृत्त्व, अलौकिकतेवरील विश्वासाची यंत्रणा, नियंत्रणाची यंत्रणा आणि प्रभावाची यंत्रणा या चार गोष्टी महत्त्वाच्या. त्यातून या कल्टचे सीलबंद जग बनते. नित्यानंदचे आश्रम हे असेच जग होते.
एकीकडे धार्मिक कर्मकांडे, त्यांची ती शिबिरे, ‘मंबोजंबो’ प्रवचने आणि आश्रमातील कामे. यात तेथील प्रत्येकाला अडकवून ठेवले जायचे. पहाटे उठायचे आणि रात्री उशीरा झोपायचे. सारा लँड्रीसारखे पूर्वाश्रमीचे शिष्य सांगतात, काही चुकलेच तर मारहाण, उपाशी ठेवणे, झोपू न देणे असे प्रकार केले जायचे. काही बाबा त्यांच्या भक्तांना विशिष्ट कार्य देतात. एकच मंत्र लिहून वह्यांच्या वह्या भरा. लष्करात कदमताल, तसा हा मेंदूचा कदमताल. त्याबाहेर कोणाला विचार करता नाही आला पाहिजे. मनांच्या ‘बराकीकरणा’चे हे तंत्र. आपल्या टोळीत माणसे एकात्म व्हावीत, यासाठी त्यांना विशिष्ट ‘आयडेंटिटी’ बहाल केली जाते. काही लोक बिल्ले देतात, काही टोप्या. नेहमीच्या वापराच्या वस्तूंवरही बाबाची प्रतिमा. नित्यानंदच्या शिष्यांनाही विशिष्ट वेशभूषा आणि केशभूषा दिल्याचे दिसते. हीच बाब नामस्मरणाची.
त्याच्या शिष्यांच्या तोंडात तर सतत त्याचे नाव आहे. समोरच्यास आपण ‘रामराम’ घालतो. तेथे ‘नित्यानंदम्’ घालतात. कुठल्याही कार्याची सुरवात ‘नित्यानंद महासदाशिवोहम्’ या मंत्राने होते. अशा छोट्या-छोट्या गोष्टींतून बिंबवले जाते, की गुरू हेच आपले सर्वस्व. गुरु साक्षात् परब्रह्म! हा गुरू सांगायचा, ‘तुम्हाला अध्यात्मिक उन्नती टाळायची असेल, तर त्याची उत्कृष्ट पद्धत म्हणजे तुमच्या गुरूला ‘जज’ करा.’ म्हणजे काय, तर गुरुने काहीही केले, तरी ते पारखायचे नाही. तो एक वाक्य नेहमी सांगायचा, ‘तुमच्या गुरूची निंदा करणाऱ्याची जीभ तुम्ही कापली पाहिजे.’ कोणा आश्रमवासीयाने गुरुवर शंका घेतली, तर तो गुरुद्रोह. आणि हा गुरू तर शंकराचा अवतार. तेव्हा तो साक्षात् शिवद्रोह. त्याला कोणत्याही जन्मात क्षमा नाही. एकंदर संपूर्ण समर्पण हाच मंत्र.
आरती रावचा आरोप आहे, की याच तंत्राद्वारे त्याने आश्रमातील शिष्यांना झुलवले, स्त्रियांना भुलवले. तिला तो म्हणायचा, की कृष्णाची जशी राधा तशी मला तू. तुझ्या आध्यात्मिक उन्नतीसाठीच आपण हे करतोय. आणि तो म्हणे, हे असे अनेकींना सांगायचा. ओशोंबद्दल सांगतात, की त्यांनी आपल्याकडे पाहिले या इवल्याशा गोष्टीने त्यांचे भक्त काही दिवस हवेत चालायचे. नित्यानंद सारखे बाबा-बापू हाच मनोवैज्ञानिक खेळ खेळत असतात. शिष्य-शिष्यिणींमध्ये आपल्याबाबत असूया निर्माण करायची. त्यांच्यात स्पर्धा लावायची. सांगायचे, की तूच माझी आवडती शिष्य. पण हे कोणास कळू देऊ नको. दुसरीलाही तेच सांगायचे. हेतू हा, की सर्वांना वाटावे, त्यांच्यावरच स्वामींची परमकृपा आहे. खरे तर या अशा स्वामींची परमकृपा असते ती फक्त स्वतःवर. हे ज्यांना कळते, ते बाहेर पडतात. नाही कळत, ते त्याच जंजाळात अडकतात. आपला बाबा हाच ईश्वरी अवतार समजत जीवन कंठत राहतात. त्यांना ना धर्म समजलेला असतो, ना देव.
हे असे गुरू आणि हे असे ‘ब्रेनवॉश’ झालेले भक्त पाहिले की सतत आठवत राहतात पुलंचे ‘धोंडोपंत’. अशाच एका स्वामीचा अनुभव घेऊन आल्यानंतर ते म्हणाले होते - ‘आमचे वडील म्हणत, बेंबट्या, ब्रह्मदेवान् एवढी सृष्टी निर्माण केली, पण त्याचा आवडता प्राणी गाढव! म्हणून मनुष्यप्राण्यांतदेखील त्यानें गाढवाचा अंश घातलाय. जगांत कुंभार थोडे, गाढवेंच फार! तस्मात् कुंभाराची चलती आहे. कुंभार हो. गाढवांस तोटा नाहीं!’.
०००
(या लेखासाठी प्रामुख्याने विविध वृत्तसंकेतस्थळांवरील बातम्या, काही न्यायालयीन निकाल, ‘माय डॉटर जॉइन्ड अ कल्ट’ ही डॉक्युमेंट्री, तसेच नित्यानंदशी संबंधित संकेतस्थळांचा आधार घेतला आहे.)
(पूर्वप्रसिद्धी - ‘पुढारी’ दिवाळी अंक-२०२५)


