ऐसे स्वामी ‘कैलास’वासी! - भाग २

मोठे प्रभावशाली व्यक्तिमत्त्व आहे त्याचे. अंगी वक्तृत्त्वकला आहे. धार्मिक ग्रंथांचे उत्तम वाचन आहे. चांगली स्मरणशक्ती आहे. धूसर धार्मिक संकल्पनांची पेरणी करून बोलतो असे, की ऐकणाऱ्यास काहीही समजले नाही, तरी वाटावे, की मोक्षच गावला. एका प्रवचनात तो म्हणाला होता, ‘मी इज ओन्ली सिटिंग ॲज मी इन यू. धिस टू ओन्ली टॉकिंग टू इच अनादर… सो द मी रिसाईड्स ऑल ऑफ दॅट ॲज मी. सो दॅट मी थ्रू धीस मी, टॉकिंग टू मी.’ काय समजले? पुलंच्या ‘असा मी असामी’तल्या धोंडोपंताना भेटलेला ‘रॅवरंड गुरूद्येवा संप्रभवानंदास्वामी’ याचा हा आधुनिक अवतारच म्हणायचा. पुन्हा बेमालूम थापा मारण्यात प्रवीण. अंगातील वस्त्रांचा रंग तेवढा त्यागाचा. बाकी राहतो राजासारखा. बसतो चांदीच्या सिंहासनावर. मस्तकी भरजरी शिरस्राण. गळ्यात सोन्याचे मोठेमोठे हार. सत्संगाला येतो तेही राजेशाही मिरवणुकीने. मागेपुढे अब्दागिऱ्या, ललकाऱ्या, ढोल-नगारे. दाक्षिणात्य पौराणिक चित्रपटांत राजगुरू वगैरे असतात तसे ते सगळे. या अशा चमचमाटाने डोळे दीपतात लोकांचे. तोच त्याचा उद्देश असतो. पूर्वी मात्र असे नव्हते. 


बिडदी येथे त्याने नवा नवा आश्रम स्थापन केला होता तेव्हाची गोष्ट. मोजकेच शिष्य सोबत असायचे. आजुबाजूच्या गावांतून भाविक मंडळी सत्संगास यायची. त्यातले काही लोक आश्रमात श्रमदान करायची. माणसे श्रद्धाळू असतात. त्यांना वाटायचे, हे देवाचे काम. ते केले, तर आपल्या खाती थोडे पुण्य तरी जमा होईल. अशा माणसांमध्ये नित्यानंद जाणीवपूर्वक कोणताही बडेजाव  न करता वावरायचा. मोठ्या माणसांनी आपण छोटे आहोत असे म्हटले, की ते लोकांना भावते. तो माणूस त्यांना अधिक मोठा वाटू लागतो. नित्यानंद त्या लोकांची विचारपूस करायचा. त्यांच्यात बसून जेवायचा. त्या वेळी त्याची वृद्ध माता - लोकनायकी - ही आश्रमात राहात असे. ती माता कधी कधी पंगतीत जेवण वाढण्याचे काम करायची. साध्या गोष्टी. लोकांना त्या आवडतात. त्या काळात त्याला पाहिलेली एक वृद्धा सांगते, ‘त्यांना पाहून वाटायचे साक्षात देवाचा अवतार आहे. साध्या दहा बाय दहाच्या खोलीत राहायचे. खोलीत फक्त एक टेबलफॅन. साधी शाल असायची अंगावर तेव्हा. सोन्याचे दागिने नसायचे.’ कुठून असणार? तोवर भोळ्याभाबड्या भक्तांचा दानयज्ञ सुरू झालेला नव्हता. त्याच्या या दागिन्यांची मोठी चर्चा असायची.