सकाळची सूर्योदयानंतरची वेळ. बिडदी आश्रमात स्वामींचा सत्संग. एका मोठ्या मंडपात मधोमध चांदीच्या सिंहासनावर स्वामी विराजमान. नुकतेच न्हालेले. केस मोकळे. थोडीशी वाढलेली काळी दाढी. अंगात घट्ट भगवी कफनी. गळ्यात भगवा शेला. वर्ण काळसर. चेहरा हसरा. हसताना उठून दिसणारी शुभ्र दंतपंक्ती. चारी बाजूंना भक्तांची गर्दी. त्यात काही परदेशी महिला. त्यातील बरेचसे आदिनिवासी. समाजशास्त्रात आदिनिवासी ही एक संकल्पना आहे. ते म्हणजे देशातले मूलनिवासी, आदिवासी. पण हे आदिनिवासी वेगळे. मठात नव्याने अध्यात्म, योग, समाधी वगैरे शिकायला आलेले हे लोक.
स्वामी बोलत होते - ते अर्थातच दाक्षिणात्य इंग्रजीत - ‘मला माहीत नाही, इथं किती लोकांच्या हे ध्यानात आलंय. मला आज ध्वजारोहणास थोडा उशीर झाला. तो ६.४० ते ७ या वेळेत व्हायला हवा. पण मी सूर्याला सांगितलं, मी ध्वजारोहण करीपर्यंत बाहेर येऊ नकोस. आणि आज सूर्योदय ४० मिनिटं उशीरा झालाय. टूडे फॉर्टी मिनट्स सनराईज लेट्ट!’
कुणाला वाटेल, स्वामीजी थट्टा करताहेत. गमतीने बोलताहेत. पण नाही. ते गंभीर होते. हातवारे करीत समजावून सांगत होते, ‘गुगलवर बिडदीची सूर्योदयाची वेळ पाहा आणि आज सूर्योदय नेमका कधी झाला ती वेळ पाहा. टूडे फॉर्टी मिनट्स लेट!’
हे ऐकताच भक्तांनी टाळ्यांचा कडकडाट केला. अनेकांच्या चेहऱ्यावर हसू होते. पण ते मान्यतेचे. स्वामीही आत्मविश्वासाने किंचित हसले. म्हणाले, ‘यू वॉंट टू सी. खरंच तसं घडलंय. जेव्हा मी बाहेर आलो. ध्वजारोहण केलं. त्यानंतर सूर्य पूर्वेला उगवला! ते काही ढगांमुळे नाही. ढग तर तिकडं उंचावर होते.’ (व्हिडिओ लिंक - https://www.youtube.com/watch?v=RQLIIx9cBIc)
हे नित्यानंद स्वामी. त्यांच्या संकेतस्थळानुसार - ‘एसपीएच भगवान श्री नित्यानंद परमशिवम’. ‘एसपीएच’ म्हणजे ‘सुप्रीम पॉंटिफ ऑफ हिंदूइझम’ - हिंदूंचे सर्वोच्च गुरू. ते स्वतःस भगवान शंकराचा अवतार म्हणवतात. ४ जुलै २०१९ ला त्यांनी केलेला तो सूर्य थांबवल्याचा दावा खरा मानला, तर त्यांना प्रत्यक्ष देवच मानावयास हवे. अखेर सूर्योदय लांबवणे ही साधी गोष्ट नाही. लहानपणी आपण सारेच लंपन असतो. तेव्हा वाटत असते, की सूर्य डोंगरामागे जाऊन बसतो. मग रात्र होते. डोंगरातून बाहेर आला की दिवस होतो. माणसांचा मेंदू वाढला, की त्याला समजते, की ते तसे नसते. सूर्योदय, सूर्यास्त या क्रिया होतात त्या पृथ्वीच्या गतीमुळे, परिभ्रमण आणि परिवलनामुळे. सूर्योदयाची नैसर्गिक वेळ लांबवायची, तर पृथ्वीची गती थांबवली पाहिजे. आता ते केले, तर अनर्थच व्हायचा. पण आपल्या परमशिवम स्वामींनी ते केले. आणि त्यांच्या लाखो भक्तांनी ते मानले.
असे अनेक ‘चमत्कार’, नाना अलौकिक दावे केले आहेत स्वामींनी. उदाहरणार्थ २० सप्टेंबर २०१८ चा हा दावा. बैल आणि गोमाता तमिळ आणि संस्कृतमधून बोलू शकतील, असे सॉफ्टवेअर तयार केल्याचा.
ते सांगत होते, ‘त्या सॉफ्टवेअरची यशस्वी चाचणी घेतल्यानंतरच मी हे जाहीर करतोय. काल त्याची सहजच चाचणी घेतली. ते व्यवस्थित काम करतेय. म्हणून मी हा दावा करतोय. समजलं? हे रेकॉर्डवर येऊ दे, की एका वर्षात मी ते दाखवून देईल.’ स्वामींनी हे म्हणताच, त्या सत्संग मंडपात हा ढोल-ताशांचा दणदणाट झाला. ‘आय हॅव डेवलप्ड अ प्रॉपर… फोनेटिक… लिग्विंस्टिक कॅपेबल व्होकल कॉर्ड फॉर मंकीज.’ एवढेच नव्हे, तर त्यांनी वाघ आणि सिंहांसाठीही असे स्वरयंत्र विकसित केले आहे. म्हणजे केवळ गायी आणि बैलच नव्हे, तर माकडेही संस्कृत बोलू शकतील. लक्षात घ्या, स्वामी हे खऱ्याखुऱ्या बैल आणि माकडांबद्दल बोलताहेत! (व्हिडिओ लिंक - https://www.youtube.com/watch?v=YEoXuuY4-0o) या दाव्याच्या पोटात आणखी एक दावा होता. त्याकडे फारसे कोणाचे लक्ष गेले नाही. पण स्वामी म्हणाले होते, की ‘माकडे आणि अन्य काही प्राण्यांत आपल्यासारखी अंतर्गत इंद्रिये नसतात. पण त्यांच्यात सुपरकॉन्शियस ब्रेकथ्रू इनिशिएट करून (- म्हणजे काय ते आपल्यासारख्या अल्पबुद्धी जनांस समजण्यापलीकडचे आहे. पण ते करून -) त्या प्राण्यांमध्ये तशी इंद्रिये तयार करता येतील.’ म्हणजे स्वामी आता शरीरशास्त्रात नवीच भर घालणार आहेत. ते हे सांगत असताना त्यांचे भक्तजन ढोल-ताशे वाजवून त्याचे स्वागत करीत होते. समोर बसलेले मठातल्या गुरुकुलातले चिलेपिले शिष्यही कसनुशा टाळ्या वाजवताना दिसत होते.
अखंड वैज्ञानिक विश्वाचा पाया हादरवणारे असे आणखीही काही ‘शोध’ नित्यानंदांनी लावलेले आहेत. आपण अल्बर्ट आईन्स्टाईन यांना थोर वैज्ञानिक मानतो. पण नित्यानंदांच्या मते आईन्स्टाईन यांचे ते सुप्रसिद्ध ‘ई = एमसी स्क्वेअर’ हे समीकरण धादांत चूक आहे. हे कुणा ऐऱ्यागैऱ्याला समजणार नाही. कारण नित्यानंद सांगतात, ‘ई म्हणजे एनर्जी आणि एम म्हणजे मॅटर यांच्यातील संबंध हा केवळ शाकाहारी मेंदूलाच समजू शकतो.’ त्यांचे म्हणणे असे, की ते एम आणि सी म्हणजे एमसी नव्हे. तर ते ‘येम्सीssss’ आहे. आता एमसी हा शब्द ताणल्याने कोणता अर्थ निर्माण होतो, हे केवळ शाकाहारी मेंदूलाच समजणारे असल्याने ते अनेकांच्या डोक्यावरून गेले असणार. नित्यानंदांच्या जगभरात पसरलेल्या भक्तजनांना मात्र त्यात खचितच काही तरी अर्थ गावला असेल.
तेव्हा ‘जॉली एलएलबी’तील त्या वकिलाप्रमाणे आपणही हा प्रश्न विचारला पाहिजे, की ‘कहाँ से आते है यह भक्तलोग?’ तत्पूर्वी, बलात्काराचा आरोप झालेला, सेक्स-सीडीमुळे कुप्रसिद्धीस पावलेला, ‘कोणतेही न्यायालय मला हात लावू शकत नाही. मी परमशिव आहे’, असे उद्दाम उद्गार काढणारा, भारतातून सहजी पळून जाण्याचा ‘चमत्कार’ करणारा आणि ‘कैलास’ नामक आभासी राष्ट्र निर्माण करणारा हा नित्यानंद हे नेमके काय प्रकरण आहे हे समजून घेणे गरजेचे. भारतातील धार्मिक विश्वाला अनेक राहुकेतूंनी ग्रासलेले आहे. ते मोठे होतात कसे, त्यांच्या मागे लोक जातात कसे हे जाणून घ्यायचे असेल, तर या नित्यानंदांची कुंडली नीट पाहावी लागेल.
०००
हे महाशय नेमके आले कुठून? नित्यानंदच्या तथाकथित ‘राष्ट्रा’चे, तसेच विविध वृत्तपत्रांची संकेतस्थळे सांगतात, की या स्वयंघोषित ‘हिंदूंचा सर्वोच्च गुरू, जगद्गुरू महासन्निधानम, हीज डिव्हाईन होलीनेस भगवान नित्यानंद परमशिवम्’ याचा जन्म तामिळनाडूतील तिरूवन्नमलाई येथे झाला. त्याचे मूळ नाव अरूणाचलम राजशेखरन. वडिल अरुणाचलम. आई लोकनायकी. वडिलांचे किराणा मालाचे दुकान होते. त्याला दोन थोरले भाऊही आहेत. हे धाकटे पुत्ररत्न बहुधा जन्मतःच अतिथोर असावे. कारण त्याच्या जन्म तारखेबाबत वाद आहे. ‘नित्यानंदपीडिया’ हे संकेतस्थळ सांगते, त्याचा जन्म २ जानेवारी १९७८चा. त्याने कर्नाटक उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकांत जन्म तारीख दिली होती १ जाने १९७८ आणि त्याने २००३मध्ये अमेरिकेचा व्हिसा घेतला होता. त्यावर जन्मतारीख नोंदवली होती १३ मार्च १९७७. सगळाच घोळ.
पुढची कथा अशी, की हा राजशेखरन तीन वर्षांचा असताना त्यांच्या घरी एक साधू आले. योगीराज योगानंद पुरी त्यांचे नाव. त्यांनी या तीन वर्षांच्या बालकास आपला शिष्य बनवले. त्यांनी म्हणे भाकित केले होते, की हा पुढे जाऊन मोठा संत होईल. राजशेखरन शाळा वगैरे शिकला. महाविद्यालयात जाऊन यांत्रिकी अभियांत्रिकीची पदविका घेतली. ते पदविका प्रमाणपत्र अद्याप कोणास दिसलेले नाही. जन्मदिनांकाप्रमाणेच या बाबतही शंका. एकंदर अजैविक पुरूषाची तमाम लक्षणे त्याच्यात दिसतात. पुढे त्याच्या गुरुचा देहांत झाला आणि याने गाव सोडले. वयाच्या १७व्या वर्षी तो बंगळुरात आला. हे साल असावे १९९४-९५. नित्यानंदचा दावा असा, की वयाच्या बाराव्या वर्षापासून त्याला आध्यात्मिक अनुभव येऊ लागले आणि २२व्या वर्षी पूर्ण दैवीज्ञान प्राप्त झाले. याचे वर्णन त्याने एका चित्रफितीत केले आहे. तिरुवन्नमलाई येथे अरुणाचल (किंवा अन्नामलाई) टेकडी नावाचे शैव पंथीयांचे पवित्र स्थान आहे. तेथे हा समाधी लावून बसला होता. अचानक त्याला आपल्या आत आत काही तरी जात आहे असे वाटले. काही क्षणांतच डोळे न उघडताही आजुबाजूचा सर्व परिसर त्याला ३६० अंशात दिसू लागला. आपण ‘सगळ्या कॉसमॉसमध्ये भरलेलो आहे, जिवंत आहे’ असे त्याला वाटू लागले. ‘कॉसमॉस’, ‘एनलाईटमेन्ट’, ‘वननेस’, ‘डिव्हाईन ब्लिस’ अशा शब्दांची पेरणी केली की सारे कसे गूढरम्य वाटते!
एक खरे, की या वयात नक्कीच त्याची मोठी आध्यात्मिक प्रगती झाली असावी. बंगळुरूपासून तीसेक किमी अंतरावर बिडदी नावाचे गाव आहे. टोयाटोचा मोठा कारखाना आहे तेथे. या गावात पुढच्या आठ-नऊ वर्षांत, २००३ मध्ये त्याने स्वतःचा मठ स्थापन केला. त्याला नाव दिले नित्यानंद ध्यानपीठम. या काळात तो बंगळुरूमधील रुग्णालयांत जायचा. तेथे लोकांना ‘बरे’ करायचा. नाडी, चक्र, कुंडलिनी अशा संज्ञा मुखोद्गत असतातच. त्या जीभेवर भीजत ठेवायच्या. रुग्णांच्या कपाळावर अंगठा ठेवायचा. त्यांचे हात हातात घ्यायचे. मंत्र पुटपुटायचे. रुग्णालयात तसेही औषधपाणी सुरू असतेच. त्याने काही बरे होतात. काही खपतात. बरे झालेले रूग्ण आपल्या खाती जमा करायचे. मेले ते रुग्णालयाच्या नावावर नोंदले जातात. बरे झालेल्यांनाही वाटते, की ‘ही तो स्वामींची कृपा’. त्याची कर्णोपकर्णी जाहिरात करायची. यायोगे बाबाचे नाव हळुहळू पंचक्रोशीत होऊ लागते. काही चलाख-स्वार्थी, बरेचसे भोळेभाबडे लोक भोवती जमा होतात. त्यातील धनवंत, सत्तावंत हेरायचे. त्यांना गुंडाळायचे. त्या लोकांच्या प्रभावाचा उपयोग करून आपण मोठे व्हायचे. ही साधारण ‘मोडस ऑपरेंडी’. नित्यानंद त्यात प्रवीण होता. त्याने आपल्या भोवती अनेक प्रभावशाली लोक गोळा केले. त्याचा मठ वाढू लागला. पुढच्याच वर्षी, २००४मध्ये त्याने येथे स्वतःचा अभिषेक करून घेतला. नित्यानंदच्या ‘श्रीपुरसर्वज्ञपीठम-किंगडम्स.कैलासा.एसके’ या संकेतस्थळातील नोंदीनुसार, १२ जून २००४ रोजी बिडदी मठात नित्यानंदचा ‘कैलास परंपरागाथा श्रीपूर सर्वज्ञपीठम्’चा राजा म्हणून अभिषेक झाला. हे श्रीपूर कोणते? तर सध्याचे हैदराबाद. सत्य साईबाबा (हे तेव्हा हयात होते) यांनी त्यांना औपचारिकरीत्या श्रीपूरचे राजा आणि अवतार म्हणून मान्यता दिली. सत्य साई ट्रस्टचे अध्यक्ष श्रीनिवासन आणि तेथील काही भक्तमंडळी, तसेच सत्य साईबाबा मंदिराचे पुजारी खास अभिषेक करण्यासाठी बिडदी येथे आले होते. आता याबाबतही वाद आहे. याचे कारण, ते श्रीनिवासन (चेट्टायर) हेच सांगत आहेत, की सत्य साईबाबांनी नित्यानंदला राजा आणि अवतार म्हणून मान्यता दिली असे काहीही घडलेले नाही. ‘मी बिडदीला गेलो होतो. पण नित्यानंदच्या बोलावण्यावरून. त्याला आश्रमात पादुका पूजन करायचे होते यासाठी. त्यासाठीच्या पादुका आणि किरिट यांची व्यवस्था स्वतः नित्यानंदनेच केली होती. या गोष्टी सत्य साईबाबांनी पाठवल्या असे म्हणणे चूक आहे.’ याचा अर्थ नित्यानंदने आपले महत्त्व वाढवण्यासाठी, सत्य साईबाबाचा आपल्याला मान्यता आहे हे दाखवण्यासाठी ती थाप ठोकली होती. या अशा थापांच्या जोरावर प्रभावनिर्मिती केली जात होती. बिडदीसह बंगळुरू, हैदराबाद, अहमदाबाद अशी त्याची घोडदौड सुरू झाली होती.
मठ, आश्रम, संस्थान आदी धार्मिक संस्थांचा विकास कसा होतो, हे वेगळे सांगावयास नको. त्याची ‘टेम्प्लेट’ ठरलेली आहेत. नित्यानंदनेही तीच हाताळल्याचे दिसते. बिडदीतील आश्रमात सामान्य भाविकांची गर्दी वाढत चालली होती. सुरूवातील त्याने काही प्रभावशाली लोक जमवले होतेच. त्यांच्या माध्यमातून त्याने या मठाकडे बडे नेते, चित्रपट कलावंत, उद्योजक यांना आकर्षित करून घेतल्याचे दिसते. पूर्वी धार्मिक मठ राजाश्रयाने वाढायचे. आजही त्यात बदल झालेला नाही. धार्मिक संस्था आणि राजकीय व्यक्ती हे ‘एकमेकां साह्य करू अवघे धरू सत्तापंथ’ या न्यायाने चालतात. बिडदीत तेच घडत होते. नित्यानंद राजकीय व्यक्तींमागे त्याचे धार्मिक बळ उभे करीत होता. राजकीय व्यक्ती त्याच्या भौतिक गरजा भागवत होते. हा परस्परपूरक व्यवहार उत्तम साधला होता नित्यानंदने. अनेक राजकीय नेत्यांबरोबर त्याची छायाचित्रे आजही दाखवली जातात. यात गुजरातचे तत्कालिन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी, माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांच्यासह अनेक देशी-विदेशी नेत्यांची नावे आहेत. आश्रमात येणारे सेलेब्रिटी हा आणखी एक मार्केटिंग फंडा. कुठले कुठले ‘राजे’ असलेले गणपतीही सेलेब्रिटींमुळे लोकप्रिय होतात म्हटल्यावर नित्यानंद सारख्यांची काय कथा. या आश्रमात नट-नट्या येतात, राजकारणी येतात, हे सामान्यांना तेथे धाव घेण्यासाठी पुरेसे असते. तशीही ‘महाजनो येन गतः स पंथः’ हीच आपली प्रवासी मार्गदर्शिका आहे. देशातील बदलत्या वातावरणाचाही फायदा त्याला लाभत होता. साधारणतः २०१२-१३ नंतर त्याचा आश्रम वाढू लागला. ३० एकरांवर पसरला.
हे झाले भारतातील. पण नित्यानंद हा ‘वसुधैव कुटुंबकम्’वाला. त्याने ‘कृण्वन्तो विश्वमार्यम्’ अशी प्रतिज्ञा केली होती की काय ते समजण्यास मार्ग नाही. पण त्याची दृष्टी मात्र त्याच्या अन्य काही पूर्वसूरींप्रमाणेच विदेशावर होती. बिडदीत आश्रम उघडल्यानंतर काही काळातच त्याने लॉस एंजेलिसमध्ये आपल्या आश्रमाची पहिली शाखा उघडली होती. तिचे नाव - ‘लाईफ ब्लीस फाऊंडेशन’. बाबा-बापू चलाख असतील तर त्यांच्या हे वेळीच लक्षात येते, की नेटिव्हांपेक्षा फॉरिनचे भक्त हे अधिक उपयुक्त. तेही गोरे हवेत. पाश्चात्य देश आणि गौरवर्ण यांविषयी असंख्य भारतीयांच्या मनात आजही न्यूनगंडात्मक आकर्षण असते. आपल्याकडे फार पूर्वीपासून एक धारण आहे. भारत म्हणजे अधिभौतिकतावादी आणि पाश्चात्य ते सारे भौतिकतावादी. परिणामी सारी पाश्चात्य जनता बुद्धिप्रामाण्यवादी, विज्ञाननिष्ठ वगैरे असावी असा आपला भ्रम असतो. वस्तुतः युरोप-अमेरिकेतही अनेक अंधश्रद्धाळू आहेत. अनेक धार्मिक ‘कल्ट’ आहेत. तेथील अनेकांना हिंदू, बौद्ध, त्यातही तिबेटी बौद्ध यांतील गूढतेचे आकर्षण असते. अशा लोकांना आपल्या गडबडगुंड्यात गुंडाळणे सोपे. ते ज्यांना जमले ते बाबा-बुवा, भगवान, आचार्य ‘राज्य’ करून गेले. याची जाणीव असण्याइतका तर नित्यानंद तेव्हाही चलाख होता. या चलाखीतून त्याने किमान ४० देशांत आपल्या आश्रमाचा पसारा वाढवला. धर्माचा बाजार करायचा ठरवले, की त्यात बाजाराची तंत्रे वापरणे हे ओघानेच येते. ‘चेन मार्केटिंग’ हे त्यातील एक प्रभावी तंत्र. ते कसे चालते, हे सारा स्टीफनी लँड्री हिच्या उदाहरणातून स्पष्ट होते.
सारा ही कॅनडातील लेथब्रीज येथील तरुणी. लहानपणापासून धर्माकडे ओढा असलेली. ती सांगते - ती तेरा वर्षांची असताना तिला एक स्वप्न पडले. त्यात काली मातेसारखी स्त्री दिसली. तोवर तिला हिंदु धर्म, काली माता यांची काही माहिती नव्हती. पुढे कला महाविद्यालयात गेल्यानंतर एक पुस्तक चाळताना तिला काली मातेचे चित्र दिसले. तिला आपले स्वप्न आठवले. हळुहळू ती तिची, त्या योगे हिंदू धर्माची माहिती घेऊ लागली. आत्मज्ञान, योगा, ध्यानधारणा या संकल्पनांनी तिला आकर्षित केले. एकदा व्हँक्यूव्हरमध्ये तिला नित्यानंदचे छोटे आध्यात्मिक केंद्र दिसले. सुरुवातीला २०० डॉलर भरून तिने त्यातील एका शिबिरास प्रवेश घेतला. तिला ते आवडले. २००८ मध्ये ती बिडदी आश्रमात आली. तिने हिंदू धर्म स्वीकारला. नित्यानंदने तिचे नामकरण सुदेवी म्हणून केले. २०१५मध्ये संन्यास घेतल्यावर ती झाली ‘श्री नित्यस्वरूपा प्रियनंदा’. नित्यानंदवर अपार अंधश्रद्धा होती तिची. त्यानेही तिच्या क्षमतांचा पुरेपूर वापर करून घेतला. तिच्याकडे जबाबदारी सोपवली आश्रमाच्या समाज माध्यम विभागाच्या प्रमुखपदाची.
ती सांगते, ‘एकदा आश्रमातल्या प्रवचनात नित्यानंद म्हणाला, की आपल्या आत्मजागृती - ‘इनर अवेकनिंग’ - प्रोग्राममध्ये तुम्ही प्रत्येकाने किमान १० लोकांना आणले नाही, तर तुम्ही कसले माझे शिष्य?’ हे चेन मार्केटिंग. काही हजार डॉलर शुल्क असायचे या प्रशिक्षण शिबिराचे. सारा सांगते, ‘मी विचार केला, की नित्यानंदने आपल्याला एवढे काही दिले आहे. ज्ञान, ऊर्जा, वैयक्तिक लक्ष. तर आपणही काही तरी परतफेड केली पाहिजे.’ तिने अशा शिबिरांची माहिती देण्यासाठी मग यूट्यूब चॅनेल सुरू केला. तिच्या चॅनेल हिस्ट्रीत ही तारीख आहे ५ डिसेंबर २०१०. सारा त्यावरून आश्रमातील अनुभव, कार्यक्रम दाखवू लागली. त्या काळात ५० हजार सबस्क्रायबर होते तिचे. आश्रमातील अन्य शिष्यांनाही ती समाज माध्यमाचे धडे देत असे. प्रचाराचे हे माध्यम सुरुवातीला आपल्याकडील काही मोजक्या राजकीय नेत्यांना समजले. धार्मिक क्षेत्रात त्याचा प्रभावी वापर करणाऱ्यांत नित्यानंद हा एक होता. सारा सांगते, तिच्यामुळे अनेक लोक आश्रमाशी जोडले गेले. हे पाहून नित्यानंदने तिला सांगितले, की इतरांनीही अशा चित्रफिती बनवाव्यात. मग आश्रमातील गुरुकुलातील लहान मुला-मुलींनाही अशा चित्रफिती बनवून त्या पसरवणे हे बंधनकारक करण्यात आले. ज्यांच्या चित्रफितींना फारसा प्रतिसाद मिळणार नाही, त्यांचा छळ सुरू झाला. यूट्यूब, फेसबुक यांद्वारे जगभरात नित्यानंदचे मार्केटिंग करण्यात येत होते. यातून अनुयायी वाढत होते. त्याच्या शिबिरांचे शुल्क भरमसाट. त्यातून पैसे मिळत होते. हे नवे अनुयायी आणखी काही अनुयायी आणत. अशा प्रकारे बंगळुरू, बिडदी येथील मठांची श्रीमंती वाढत चालली होती. ती किती? ‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या अंदाजानुसार, सुमारे दहा हजार कोटी रुपये! एकंदर कोणत्याही बाबाच्या संस्थानाची श्रीमंती, लोकप्रियता, दबदबा ज्या-ज्या कारणांनी वाढतो, ते ते सर्व काही नित्यानंद करीत होता. सत्तेशी घरोबा, चमत्कार कथांचा प्रचार, चेन मार्केटिंग… पण हे करूनही अनेक बाबा-महाराजांना काही त्याच्याएवढे मोठे होता आलेले नाही. नित्यानंदला ते जमले, याचे एक कारण म्हणजे त्याचे व्यक्तिमत्त्व...
(उर्वरित पुढील भागात)
(पूर्वप्रसिद्धी - पुढारी दिवाळी अंक २०२५)


