मॅनहंट



बिन लादेनच्या शोधाची थरारक सत्यकथा!

मॅनहंट
पीटर बर्गन
अनुवाद : रवि आमले

बाजारात 'बेस्टसेलर' ठरलेल्या इंग्रजी किंवा अन्य भाषांतील पुस्तकांचे मराठीत झटपट अनुवाद होतात. 'बेस्टसेलर' पुस्तकांची लोकप्रियता 'कॅश' करण्यासाठी मराठीतील प्रकाशकही घाई करतात. परिणामी, अनेक अनुवादित पुस्तकं ही निव्वळ भाषांतरित किंवा पटकन उरकलेली अशी दिसतात. सुदैवानं 'मॅनहंट'बाबत तसं झालेलं नाही. बर्गन यांनी जितक्या उत्कटतेनं आणि काळजीपूर्वक लादेनच्या शोधाचा प्रवास मांडला, तितक्याच उत्कटतेनं व काळजीनं रवि आमले यांनी त्याचा मराठी अनुवाद केला आहे. मराठी शब्दांचा आग्रही वापर आणि सुटसुटीत वाक्यरचना हे या अनुवादित पुस्तकाचं वैशिष्टय़ म्हणावं लागेल. त्याखेरीज या पुस्तकाला मूळ पुस्तकासारखा प्रवाहीपणा आलाच नसता. 'मॅनहंट' हे अनुवादित पुस्तक आहे, असं वाटत नाही, इतका अस्सलपणा या अनुवादात उतरला आहे. ओसामा बिन लादेनवर गेल्या दोन-अडीच वर्षांत बरीच पुस्तकं प्रकाशित झाली आहेत. त्यातल्या फारच थोडी अस्सल आणि कष्टपूर्वक केलेल्या संशोधनावर आधारित आहेत. 'मॅनहंट' हे त्या अधिकृत दस्तावेजांपैकीच एक.
- असिफ बागवान 





ऑनलाइन शॉपिंग 

Read more...

विवाहसंस्थेचा (बदलता) इतिहास

संस्कृती म्हणजे काचेचे भांडे. बाईच्या इज्जतीप्रमाणे तिला एकदा तडा गेला की गेलाच. तो परत सांधता येत नाही. असे जर आपले विचारऐश्वर्य असेल, तर मग सगळा प्रश्नच मिटतो. आपल्याला मग थोर सांस्कृतिक-गुरख्याच्या भूमिकेत जाण्यावाचून गत्यंतरच नसते. आणि एकदा माणूस त्या भूमिकेत गेला, की त्याच्या हाती लाठी, काठी, दंड, दगड यांशिवाय दुसरे काही असूच शकत नाही. अशा माणसांची दृष्टी अधू आणि संवादाचे इंद्रिय पंगू झालेले असते. त्यांच्याशी बोलणे होऊच शकत नाही. मात्र इतरांची, म्हणजे तुमच्या-आमच्यासारख्या सर्व सामान्यांची गोष्ट जरा निराळी असते. आपण हे समजून घेऊ शकतो, की संस्कृती हे साचलेले डबके नसते. ती प्रवाही असते. बदल हा तिचा स्थायीभाव असतो आणि सांस्कृतिक नीतिमूल्ये नेहमीच कालसापेक्ष असतात. तिच गोष्ट त्या-त्या संस्कृतीतून जन्मलेल्या सामाजिक संस्थांची. त्यांत कालानुरूप बदल झाले नाही, तर त्या संस्था कोसळतात तरी किंवा कुजतात तरी आणि शिल्लक त्यांची ममीभूत कलेवरेच राहतात. ज्या बदलतात, त्या शतकांचे रस्ते चालूनही सळसळत्या राहतात. उदाहरणार्थ आपली भारतीय विवाहसंस्था.

Read more...

रॉ फाइल

आपल्याकडच्या प्रत्येक दहशतवादी कारवाईमागे इंटर सर्व्हिस इंटेलिजन्स (आयएसआय) या पाकिस्तानी गुप्तचर संस्थेचा हात असतो, असे म्हणण्याची पद्धत आहे. तशीच रीत पाकिस्तानातही आहे. तेथील प्रत्येक दहशतवादी हल्ल्यामागे रिसर्च अँड अँनालिसिस विंग (रॉ)चा हात आहे, असे म्हटले जाते. तीन वर्षांमागे लाहोरमध्ये अहमदींवर भीषण हल्ला झाला होता. ८० लोक त्यात मारले गेले होते. तर पाकिस्तानमधील द नेशन या इंग्रजी दैनिकात पहिल्या पानावर ती हल्ल्याची बातमी होती आणि शेवटच्या पानावर पाकिस्तानात ३५ हजार रॉ एजंट कार्यरत अशा ठळक मथळ्याची सविस्तर बातमी होती. रॉच्या बाबतीत तिथे हे असे नेहमीच म्हटले जाते. कारण ते सोयीचे असते. कदाचित ते खरेही असेल, पण त्याबद्दल कोण खात्रीपूर्वक सांगणार?

Read more...

रांगडा आणि रुमानी!

नाना पाटेकरांची एक प्रतिमा आहे. रांगडा आणि परखड मनुष्य अशी. ते मोठे अभिनेते आहेतच. पण तिथंही पुन्हा हीच प्रतिमा आहे. तिथं त्याला फक्त एक जोड असते. हळव्या रोमँटिकपणाची. नाना कविता-बिविता म्हणू लागतात, तेव्हा भलतेच उबदार वाटतात. धनगरी घोंगडीसारखे. या प्रतिमांमुळं होतं असं, की नाना आपले वाटता वाटता, त्यांचा दरारा वाटू लागतो. प्रत्यक्ष बाळासाहेबांना चार शब्द सुनावण्याची ऐपत असलेला हा मनुष्य. त्यांच्या फटकळ वाणीचा दरारा वाटणारच.

नानांच्या अंधेरीच्या घरी जाताना त्यामुळे थोडी धाकधूकच होती, की त्यांचा मूड असला तर बरं. रस्त्यात चार ठिकाणी पत्ता विचारत पोचलो, तेव्हा संध्याकाळ झाली होती. इमारतीच्या खालून संपादकांनी त्यांना मोबाईल लावला. त्यांनी खिडकीतून खाली डोकावलं आणि खणखणीत साद दिली – गिरीश...
म्हटलं, व्वा! अंधेरीच्या उच्चभ्रू सोसायटीत अशी वरून जोरात हाक मारणं हे टिपिकलच!

Read more...

अश्लीलतेच्या नावाने....

(पूर्वप्रसिद्धी : लोकप्रभा, १४ सप्टे. २०१२)
|| १ ||
एकंदरच सध्या श्लील-अश्लील असा काही धरबंध उरलेला नाही. धर्म व संस्कृतीची चाड राहिलेली नाही. रोजची वृत्तपत्रं (उदा. चित्रपट पुरवण्या), चित्रपट (कुणा एकाचं नाव सांगता येईल का इथं? सगळेच म्हणा ना... डर्टी पिक्चर वगैरे!), नाटकं (उदा. फुल्या फुल्याच्या मनीच्या गुजगोष्टी. हे नाव चारचौघात उच्चारणंही कसंसंच वाटतं!), जाहिराती (उदा. कामसूत्र वगैरे) यांपासून साहित्यापर्यंत सर्वत्र अश्लील धुडगूस चालू आहे. लोक वाट्टेल तसं ग्राम्य वागत आहेत. पेयपानगृहांपासून समुद्रकिना-यांपर्यंत सर्वत्र सनातन भारतीय परंपरेला हरताळ फासण्याचे असभ्य उद्योग सुरू आहेत. हे सगळं थांबलं पाहिजे. ही असंस्कृतता आपण बंद केली नाही, तर पाच हजार वर्षांच्या भारतीय परंपरेचे पाईक होण्याची पात्रता आपल्या अंगी नाही, असंच म्हणावं लागेल. हे कदापि चालणार नाही. हे आम्ही सहन करणार नाही....
असे काही ज्वलजहाल सुविचार आपल्या मनात खदखदत असतील, तर मग आपल्यापुढं एकच पर्याय राहतो. तो म्हणजे ही सगळी अश्लीलता, असभ्यता, असंस्कृतता, ग्राम्यता मुळापासून निखंदून काढण्याचा. आता हे निर्मूलनाचं संस्कृती बचावो काम करायचं तर त्याची सुरुवात कुठूनतरी, म्हणजे खरं तर सुरुवातीपासूनच करायलाच पाहिजे. तेव्हा मग ही सुरूवात शोधणं आलं.

Read more...

पुलं इतिहासजमा झाले आहेत काय?

(पूर्वप्रसिद्धी - रविवार लोकसत्ता, ६ नोव्हेंबर २०११)

पुलं इतिहासजमा झाले आहेत काय, हा प्रश्न तसा संतापजनक आहे. पुलं म्हणजे मराठी संस्कृतीची समृद्ध साठवण आहे. आजच्या भाषेत सांगायचे, तर महाराष्ट्राचे 'आयकॉन' आहेत. मराठी रसिकतेचे मानिबदू आहेत. 1942 पासून आजतागायत मराठी वाचकांच्या काही पिढ्यांना त्यांच्या विनोदाने शहाणीव दिलेली आहे. अशा परिस्थितीत ते, म्हणजे त्यांचे लेखन इतिहासजमा झाले आहे काय, असे विचारणे कुणासही वाह्यातपणा वाटू शकतो. पण आज अनेक ठिकाणांहून, खासगी वाड्मयीन चर्चातून हा प्रश्न समोर येताना दिसतो. त्या प्रश्नाचा सोपा अर्थ एवढाच असतो, की पुलंचे साहित्य आजच्या, समाजातील मध्यमवर्ग नामशेष होऊ घातलेल्या काळात शिळे झाले आहे काय?


Read more...