नवं पुस्तक - प्रोपगंडा



हे पुस्तक म्हणजे ‘प्रचारभान’मधील लेखांचे निव्वळ संकलन नाही. वृत्तपत्रीय लेखनाला दोन मर्यादा असतात. एक म्हणजे उपलब्ध जागेची आणि दुसरी संपादकीय भूमिकेची. ‘लोकसत्ता’त ही दुसरी मर्यादा कधीच जाणवली नाही हे येथे आवर्जून नमूद करायला हवे. एखाद्या लेखकास सदर दिले, म्हणजे ती जागा त्याची झाली. आपणांस पटत नसलेली वा आपल्या वृत्तपत्राच्या भूमिकेत बसत नसलेली मते तो मांडत असला, तरी ते त्याचे स्वातंत्र्य आहे. त्या लेखनस्वातंत्र्याच्या आड संपादकांनीही येता कामा नये, ही संपादक गिरीश कुबेर यांची भूमिका. पत्रकारितेत हे हल्ली दुर्मीळच. जागेची मर्यादा मात्र असतेच. त्या विशिष्ट शब्दसंख्येतच लेख बसवावा लागतो. त्यामुळे सांगण्यासारख्या बऱ्याच मजकुराला कात्री लावावी लागते. विस्तार टाळावा लागतो. पुस्तकाच्या पायात या बेड्या नसतात. या पुस्तकासाठी ‘प्रचारभान’मधील सर्वच लेखांचे पुनर्लेखन, संपादन केले. त्यात भर घालून ते अधिकाधिक माहितीपूर्ण व्हावेत असा प्रयत्न केला. या विषयाबद्दल नव्याने उपलब्ध झालेल्या माहितीची त्याला जोड दिली. सदरात जाऊ शकली नव्हती अशी काही प्रकरणे नव्याने लिहिली. यामुळे ‘प्रचारभान’च्या तेव्हाच्या वाचकांनाही या पुस्तकातून नवे काही वाचल्याचे समाधान मिळू शकेल, असा विश्वास वाटतो....




Read more...

रॉ - थरार शब्दोशब्दी...

बीबीसीतील पत्रकार आणि आमचे वाचनवेडे सुहृद पराग फाटक 
यांनी त्यांच्या फेसबुक खात्यावरून करून दिलेला 
रॉ - भारतीय गुप्तचरसंस्थेची गूढगाथा
या पुस्तकाचा परिचय...




पराग फाटक

रिसर्च अँड अनॅलिसिस विंग अर्थात रॉ हे ऐकल्यावर किंवा वाचल्यावर पॉश एरियामध्ये तगडा एसी असणाऱ्या ऑफिसमध्ये बैठं काम करणाऱ्या मंडळींचं ऑफिस असा समज होणं साहजिक। पण दिसतं तसं नसतं। RAW या संज्ञेभोवती गुप्तता, गोपनीयता, गूढता यांचा पडदा आहे। त्यापल्याडचं विश्व समजून घ्यायचं असेल तर हे मस्ट रीड पुस्तक आहे। 
भक्त आणि ट्रोल अशी विभागणी होणाऱ्या कालखंडात हे पुस्तक वाचणं अत्यावश्यक आहे। देशभक्ती, राष्ट्रवाद या संकल्पनांबद्दल आपल्या मनात साचेबद्ध गोष्टी नोंदलेल्या असतात। हे पुस्तक ही झापडं भिरकावून देतं। 
पुस्तक वाचताना अनेकदा आपल्याला सांस्कृतिक धक्के बसतात। दुसऱ्या देशाचं सरकार खिळखिळ करणं, प्रतिस्पर्धी देशातल्या अति महत्वपूर्ण व्यक्तींचं बोलणं टॅप करणं, त्या देशांचा गोपनीय डेटा फोडणं, शत्रूराष्ट्राच्या शत्रूला हाताशी धरून स्वतंत्र मोट बांधणं, शत्रूराष्ट्रात तेढ निर्माण व्हावी यासाठी फुटीरतावादी संघटनांची स्थापना, त्यांना प्रशिक्षण, निधीपुरवठा करणं, त्या देशाची फाळणी होऊन आणखी तुकडे होऊ देणं हे आणि अशा असंख्य विघातक गोष्टी पण हेतू-उद्दीष्ट एकच, देशासाठी।
देशासाठी सीमेवर लढणारा जवान एवढंच आपण जाणून असतो पण या शांतीत क्रांती आर्मीबद्दल आपण अनभिज्ञ असतो। या बॅकऑफिस सेनेबद्दल अनेक प्रवाद आहेत, अनेक दंतकथा आहेत- वाचायचं काय आणि सत्य काय मानायचं हाही विषय आहे। हे पुस्तक आपल्याला गुप्तहेर, गुप्तहेरांची कामं, देशांतर्गत आणि मुख्यत्वे आंतरराष्ट्रीय समीकरणं, त्यामागचे अन्वयार्थ उलगडून दाखवतं। आपल्यापर्यंत येणाऱ्या बातम्यांचे आतले कंगोरे किती वेगळेच असतात याची जाणीव होते। अमुक क्षणी, तमुक कालखंडात संबंधित व्यक्ती असं का वागली होती याची उकल पुस्तक वाचताना आपल्या मनात होते। देश चालवणाऱ्या व्यक्ती सर्वसमावेशक असणं किती आवश्यक आहे याची सातत्याने जाणीव होते। 
हे पुस्तक वाचताना आपण दमून जातो। शेकडो माणसांचे उल्लेख आहेत। अनेक जांगडगुत्ते आहेत। लोक गोष्टी एवढ्या जटिल का होऊ देतात असं वाटत राहतं। पण तरीही हे पुस्तक रँडम सनावळ्या राहत नाही। खिळवून ठेवण्याची ताकद या लिखाणात आहे। थरार शब्दोशब्दी भरला आहे पण एकदाही सनसनाटी करण्याची धडपड दिसत नाही। या लिखाणाला विषयाच्या अतीव आवडीची, खंडप्राय वाचन आणि संशोधनाची, खूप साऱ्या आशयघन चर्चांची बैठक आहे। आपल्या सगळ्यांना इतिहास शिकवला जातो। पण इतिहासाला वेगळा आयाम देणाऱ्या मानकऱ्यांबद्दल का सांगितलं जात नाही? असा प्रश पडतो। त्यांचं काम 'नाही चिरा नाही पणती' असंच का राहतं? 
या पुस्तकात पाकिस्तानबद्दल अनेक संदर्भ आणि प्रकरणं आहेत। तिथे जाऊन किंवा इथे बसून तिथल्या सौर्सेसद्वारे फत्ते केलेल्या मोहिमांबद्दल वाचताना रोमांच उभे राहतात। आता सगळं अत्याधुनिक तंत्रज्ञान आलं आहे पण दळवळणाची साधनं धड नसताना, संगणक-व्हाट्सअप आणि पूर्व इंटरनेट काळात या मोहिमा कशा पार पाडल्या असतील असं वाटत राहतं। बांगलादेश निर्मित्ती काळात या संघटनेने नेमकी काय भूमिका बजावली हे वाचणं भन्नाट आहे। सिक्कीमचं भारतात विलीनीकरण उशिराने झालं। त्या निमित्ताने पुस्तकात दोन प्रकरणं आहेत। ती वाचताना ही संघटना नेमकं काय काय करते असा प्रश्न पडतो। देशातलं सरकार, त्यांची राजकीय भूमिका, सत्तेचं राजकारण, उपलब्ध निधी आणि तंत्रज्ञान, जागतिक घडामोडी ही सगळी कसरत सांभाळून निर्धारित वेळेत लक्ष्य साध्य करणं प्रचंड आव्हान आहे पण या संघटनेनं ते वर्षानुवर्षे केलं आहे, करत आहे। 
काश्मीर खोरं इतकं धगधगतं का? हे काश्मीरकथा१ आणि 2मधून लक्षात येतं। परिस्थिती कशी हाताबाहेर गेली ते समजतं। सत्ता-पद-पैसा असतानाही माणसं असहाय्य होतात, परिस्थिती कसं अगतिक बनवते हे जाणवतं। 
पाकिस्तान-बांगलादेश-चीन यांच्याबद्दल सतत ऐकायला, वाचायला मिळतं पण श्रीलंकेत काय घडलं ते समजत नाही। लंकाकांड१आणि२ वाचणं अस्वस्थ करणारं आहे। डोकं गरगरून जातं। त्या सगळ्या घडामोडींचे घाव किती खोलवर उमटलेत। हे समोर बसून कधीच सांगितलं जातं नाही याची खंत वाचताना वाटते। 
पुस्तकात कुठेही रॉचं उदात्तीकरण नाही आणि विखारी टीकाही नाही। हेरगिरीचा प्राचीन इतिहास हा भाग रंजक आहे। या पुस्तकाच्या निमित्ताने रामेश्वरनाथ काव या अवलिया, द्रष्ट्या व्यक्तिमत्वाची आणि त्यांच्या प्रचंड कार्याची सविस्तर ओळख आपल्याला होते। त्यांनी दिलेला विचार आणि त्यांचा वारसा जपणारी मंडळी आपल्याला या पुस्तकामुळे समजतात। 
देशाला बळकट करणाऱ्या एका संघटनेच्या अनवट विश्वाची ही थरारक सफर आहे। थ्री डी इफेक्टवालं मुखपृष्ठ देखणं झालं आहे। 
व्यासंग, ज्ञानाची बैठक अशी माणसं कोणत्याही क्षेत्रात दुर्मीळ। पत्रकारिता त्याला अपवाद नाही। रवी सर या मोजक्या दुर्मीळ गटाचे मानकरी। राजकारण ते समाजकारण आणि सभोवताल यांच्या सखोल अभ्यासातून तिरकस, कोपरखळ्या लगावत खुशखुशीत अर्कबाज शैलीतला रविवारी प्रसिद्ध होणारा त्यांचा कॉलम रविवार आनंदमय करून देत असे। त्यांना कोणताच विषय वर्ज्य नाही। जागतिक, बॉलिवूड सिनेमे ते मराठी संत साहित्य- त्यांची मुशाफिरी वाचकाला समृद्ध करते। विषय कोणताही असो ते डुबकी घेतात आणि सर्वांगभर भिनल्याशिवाय बाहेर येत नाहीत। म्हणूनच त्यांचं कोणतंही लिखाण सर्वंकष, अभ्यासपूर्ण आणि सकस असतं। एक रोचक जग मात्र तांत्रिक तपशीलाने भरलेलं-त्याबद्दल लिहिणंही अवघड। अभ्यास, मांडणी आणि शैली यांची परफेक्ट भट्टी जमलेला हा खजिनारूपी दस्ताऐवज। रॉ साक्षर केल्याबद्दल मंडळ ऋणी राहील।


Read more...

उथळ देशभक्तीच्या वातावरणात ‘वाचावेच’ असे पुस्तक

रॉ - भारतीय गुप्तचरसंस्थेची गूढगाथा 
या पुस्तकाचा मातब्बर लेखक संजय पवार यांनी 
त्यांच्या कळफलक या सदरांतर्गत करून दिलेला 
आणि अक्षरनामा मध्ये प्रसिद्ध झालेला परिचय...  


०००


(चित्र सौजन्य - संजय पवार, अक्षरनामा)

१४ फेब्रुवारी ते २८ फेब्रुवारी २०१९ या दरम्यानच्या युद्धज्वर आणि कृतक देशभक्तीच्या पिसाट वाऱ्यात एक पुस्तक वाचनात आलं. देश, शेजारी देश, खंड, उपखंड, आंतरराष्ट्रीय राजकारण, परराष्ट्र व संरक्षण धोरण, विदेशनीती या सर्वांचा कणा असलेली जी एक हेरगिरी असते, त्यासंदर्भातलं हे पुस्तक. त्यातूनही विशेष म्हणजे भारतीय हेरगिरीवरचं हे पुस्तक मराठीत आहे. पुन्हा ते अनुवादित नाही, तर परिश्रमपूर्वक माहिती, संदर्भ गोळा करून आवश्यक तिथं भाष्य करत हे पुस्तक सिद्ध झालंय.
‘रॉ : भारतीय गुप्तचरसंस्थेची गूढगाथा’ (रवि आमले, मनोविकास प्रकाशन, पाने – २९३, मूल्य – २९९ रुपये) हे ते पुस्तक. हे पुस्तक प्रकाशित झालंय डिसेंबर २०१८ला आणि ५ जानेवारी २०१९ला त्याची दुसरी आवृत्तीही प्रकाशित झालीय. या पुस्तकावरचं एक परीक्षण वाचून हे पुस्तक घेतलं. मनोविकासचं प्रकाशन आणि रवि आमले यांचं लेखन. आमलेंच्या लेखनाचा परिचय दै. ‘लोकसत्ता’मधील त्यांच्या लेखनापासूनच होता. प्रपोगंडावरची त्यांची मालिका वर्तमान भारतीय राजकारणावरच्या अभ्यासासाठी एक चांगलं साधन होती. त्यामुळे ‘रॉ’विषयी ते काय लिहितात याची उत्सूकता होती. त्यापेक्षा आपल्या माहिती व ज्ञानात भर पडणार याची खात्री होती. या दोन्ही अपेक्षा पूर्ण झाल्या.
आजवर इंग्रजीसह परदेशी भाषांत, देशविदेशच्या गुप्तचर संस्थांबद्दलची माहिती प्रत्यक्ष संदर्भांसहित अनेक पुस्तकांतून, हॉलिवुड सिनेमांतून आली आहे. त्यातही सीआयए आणि केजीबीवर तर विपुल. अलीकडे त्यात इस्त्रायलच्या मोसादची भर पडलीय.
गेल्या चार वर्षांत कृतक देशभक्तीनं भरलेले युद्धपट, हेरगिरीपट हिंदी चित्रपटसृष्टीतही तयार झाले. पण त्यात चित्रपट कमी, प्रचार जास्त. अनुराग कश्यपच्या ‘ब्लॅक फ्रायडे’पासून तपशील, संदर्भांसह अशा पद्धतीच्या चित्रपटांची निर्मिती गंभीरपणे व थेट राजकीय (गंभीर) भाष्य करणारी होऊ लागली. सोबतीनं अॅक्शन चित्रपटातूनही आयबी, नार्कोटिक्स, डिपार्टमेंट वगैरे दिसू लागली. तरीही भारतीय सेन्सॉर, समांतर सेन्सॉर आणि गुप्तता या कारणानं आपल्याकडे आजही हॉलिवुडसारखा थेट चित्रपट करता येत नाही.
हॉलिवुड आणि युरोपात बनलेल्या अशा चित्रपटांचा कथानकांचा मुख्य स्त्रोत, आधार हा त्या त्या विषयांवर, घटनांवर प्रसिद्ध झालेले ग्रंथ आहेत. हे ग्रंथ बव्हंशी पत्रकार, शोधपत्रकार अथवा निवृत्त अधिकारी (राजनैतिक, सैनिकी, प्रशासकीय इ.) यांनी अधिकृत कागदपत्रांचा अभ्यास करून, संबंधित लोकांशी बोलून, जगभरात त्यावर प्रसिद्ध झालेल्या विविध माहितींच्या संकलनातून त्याची संगतवार मांडणी केलेली आहे.
लेखक रवि आमले त्यांच्या मनोगतात म्हणतात- ‘ ‘रॉ’सारख्या संस्थांचा इतिहास समोर येणे आवश्यक होते. त्याबाबत इंग्रजीत अलीकडच्या काही वर्षांत पाच-सहा पुस्तके प्रसिद्ध झाली. ‘रॉ’शी संबंधित असलेल्या अधिकाऱ्यांनीच ती लिहिलेली असल्याने त्याचे मूल्य मोठेच आहे. परंतु एकतर ती संख्या फारच कमी आहे. आणि दुसरी बाब म्हणजे काही अपवाद वगळता ‘रॉ’च्या कारवायांची एकत्रित माहिती त्यातून अभावानेच मिळते. मराठीतून तर तसे लेखनच झालेले नाही. ती कमतरता या पुस्तकातून भरून निघेल असे वाटते.’
रवि आमले यांनी ‘कमरता’च नव्हे तर ‘पोकळी’ भरून काढलीय हे पुस्तक लिहून!
या पुस्तकाच्या जन्मकहाणीत कुलभूषण जाधव प्रकरण आणि त्यानिमित्तानं दै. ‘लोकसत्ता’त ‘काळोखातल्या झुंझारकथा’ या लेखाचं लेखन, त्यातून ‘रॉ’विषयी वाचकांची वाढलेली उत्सूकता आणि ‘रॉ’विषयी विस्तारानं काही प्रसिद्ध होण्याची गरज आमलेंनी मनोगतात नोंदवताना मनोविकासच्या पाटकरांचा त्यासाठीचा आग्रहही नम्रपणे लिहिलाय.
अलीकडे आजवर दुर्लक्षित विषयांवर माहितीच्या महाजालातून पानेच्या पाने उतरवून ती संकलित, संपादित करून वाचकाच्या हाती देण्याची एक ‘हायब्रीड’ व्यवस्थाही तयार झालीय. त्या पुस्तकांचं एकूण स्वरूप बघता ती मोठी, विस्तारित ‘कॉफी टेबल बुक’ म्हणता येतील. काही गंभीर वाचकांसाठी ती ‘काँग्रेसी गवताची पैदास’ वाटते, पण नवसाक्षर असा जो सर्वदूर पसलेला नवभूकेला वाचक आहे, त्याला विषयांची अशी ‘तोंडओळख’ ही ज्ञानच वाटते. असो. हे सांगण्याचा उद्देश हा होता की, ‘पुस्तक लिहा’ म्हटल्यावर दिलं लिहून असं न होता डेडलाईन वर्षभर लांबली. ती का लांबली असेल याचं उत्तर या पुस्तकात शेवटी जी दहा पानी संदर्भ यादी आहे, ती वाचल्यावर मिळतं. आणि त्यामुळेच मराठीतल्या या प्रथम पुस्तकानं यापुढच्या लेखकांसाठी अशा पद्धतीच्या पुस्तकाच्या लेखनाचा आदर्श वस्तुपाठ ठेवलाय.
‘रॉ’च्या निर्मितीपासून ती कशी, कधी, कोणी केली वगैरे सर्व तपशील देत या २४ प्रकरणं असलेल्या पुस्तकाची सुरुवात होते. शेवटचं चोविसावं प्रकरण ‘रॉ’च्या वर्तमानावर भाष्य करतानाच ‘रॉ’सारख्या गुप्तचर संस्थेचं गूढ कायम ठेवतं!
सध्या भारतीय (त्यातही मराठी) वृत्तवाहिन्यांवर युद्ध, युद्धनीती, आंतरराष्ट्रीय खेळी, देशांगर्तत राजकारण याबाबत जो उन्मादी पोरखेळ चालू आहे, त्याला कारण पत्रकार म्हणवून घेणारी जमात चटावरचं श्राद्ध उरकल्यासारखे विषय उरकतात. आणि ज्ञान, प्रबोधन, माहिती यापेक्षा भांडवली हित व प्रचार यासाठी वेठबिगारी करणाऱ्यांना गांभीर्यापेक्षा जल्लोषात टीआरपी वाढवण्यात रस असतो हे आहे.
आपल्याकडच्या पत्रकारितेच्या इतिहासात मुंबईसह महाराष्ट्रात अनेक वृत्तपत्रांतून ६० ते ९० या तीन दशकात ‘उपसंपादक’ म्हणून रुजू झालेल्या अनेकांनी नंतर आवडत्या अथवा कामाचा भाग म्हणून संसदीय राजकारण, समाजकारण, अर्थकारण, नाटक, चित्रपट, विज्ञान, शेती अशा विविध विषयांत बातमी बाहेर जाऊन, ज्ञानोत्सूक होऊन अभ्यास केलाय, माहिती गोळा केलीय, गोष्टी उजेडात आणल्यात. परंतु नव्या इलेक्ट्रॉनिक माध्यमांतील पत्रकारांना माहितीचा खजिना एका क्लिकवर उपलब्ध असताना, निव्वळ समाजमाध्यमांवर शेरेबाजी, वितंडवाद नि फोटो शेअर करण्यातच पत्रकारिता वाटते! त्यातले किती जण विशिष्ट विषयाचा अभ्यास करतात कुणास ठाऊक. याउलट प्रसिद्ध माणसालाही ‘मला तुमच्याबद्दल फारसे माहीत नाही, तर तुम्हीच पाच मिनिटे तुमच्याबद्दल सांगा’ असं म्हणण्याचा निलाजरपेणा या नवमाध्यमात आहे. या पार्श्वभूमीवर रवि आमले यांचं हे पुस्तक सुजाण नागरिक व वाचकांसाठी एक मोठीच भेट आहे.
सध्याच्या राज्यकर्त्यांच्याही ‘बडबडगीतां’ना या पुस्तकातून उत्तर मिळतं आणि लक्षात येतं, सध्याच्या सत्ताधारी नेतृत्वाची इयत्ता काय! देश म्हणजे काय, जग म्हणजे काय, राज्यकारभार म्हणजे काय, याबाबतीत वर्तमान सरकारचा बुद्ध्यांक उणेच भरावा!
या पुस्तकातून पाकिस्तान फाळणीचं उत्तर मिळतं, म्हणजेच पूर्व-पाकिस्तान तोडून बांगला देशची निर्मिती. त्यानिमित्तानं इंदिरा गांधींच्या नेतृत्वाची जी उंची आपल्याला दिसते; राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय आकलन, महत्त्वाचं म्हणजे रॉ, आयबी, सीबीआय, विविध मंत्रालयं याबाबतची गंभीरता; त्यातील अधिकाऱ्यांचा सन्मान, स्वातंत्र्य आणि वेळप्रसंगी यशापयशाची जबाबदारी घेणं… ते सगळं वाचताना तो काळ, तो इतिहास तर उभा राहतोच. पण नेतृत्वाकडे बढाईखोर आणि भाषणबाजीपेक्षा संयम व मौन कसं लागतं, आणि संयम व मौन म्हणजे भेकडपणा नाही, तर ‘राजकारण’ अशी एक प्रगल्भ समज वाचकाला यातून येऊ शकते.
यात बांगला देश मुक्तीयुद्धाप्रमाणेच खलिस्तान आणि तामिळींची चळवळ, त्यांचे आंतरराष्ट्रीय धागेदोरे, त्या सर्व पेच\डावपेचांना सामोरं जाताना गमवावे लागलेले दोन पंतप्रधान, सध्या गांधी घराण्याला ‘गतिमंद’ म्हणून हिणवण्यापर्यंत राजकीय विकृती पसरलीय. या पुस्तकानं या घराण्यातील दोन व्यक्तींनी देश चालवताना तो किती प्रकारे तोलून धरत हा देश ‘लोकशाहीवादी’ राहिल याची कशी दक्षता घेतली ते सोदाहरण दाखवलंय. या हौताम्याची योग्य ती दखल घेतानाच, त्यांच्या राजकीय चाली, चुकीचे निर्णय, त्याचे परिणाम यावरही बोट ठेवलंय.
या पुस्तकात अनेक तपशील वेगळ्या अर्थानं रंजक, आश्चर्यकारक तर आहेतच, पण त्या त्या व्यक्तींच्या पारंपरिक प्रतिमांना छेद देणारेही आहेत.
बांगला देश निर्मिती दरम्यान मूजिबूर रेहमान यांना पाकिस्तानने फाशी देऊ नये यासाठी भुत्तोंचं मन वळवण्यासाठी ‘रॉ’नं त्यांच्या एका जुन्या मैत्रिणीचा केलेला उपयोग वाचताना आपल्याला हिंदी सिनेमाची आठवण येते. पुढील तपशील येतो – ‘४ मार्च रोजी ऐज्वालवर हवाई दलाच्या जेट विमानातून बॉम्बगोळे टाकण्यात आले. मशिनगनने मारा करण्यात आला. हवाईदलाच्या या बॉम्बफेकी विमानांच्या चालकांमध्ये दोन वैमानिकांचा समावेश होता. त्यातील एकाचे नाव होते राजेश पायलट आणि दुसऱ्याचे सुरेश कलमाडी!’
याप्रमाणेच मोरारजी देसाई, अटल बिहारी वाजपेयी, फारुख अब्दुल्ला, लालकृष्ण अडवाणी, जॉर्ज फर्नांडिस असे अनेक नेते विविध रूपांत या पुस्तकात ऐतिहासिक दस्तावेज म्हणून उभे राहतात.
एक देश चालवणं ही किती गंभीर कृती असते, हे या पुस्तकातून आपल्याला गांभीर्यानं समजून घेता येतं.
मनोविकास प्रकाशनाला विनंती आहे, या पुस्तकाच्या प्रती सर्व मराठी वृत्तवाहिन्यांना मोफत प्रौढ व बालसाक्षर योजनेखाली पाठवून द्याव्यात. यातील विनोदाचा भाग सोडून उर्वरित नागरिक वाचकांनी हे पुस्तक विकत घेऊन पुस्तक वाचावं, संग्रही ठेवावं आणि साक्षर व्हावं, एवढंच आवाहन. रवि आमले व मनोविकासचं खास अभिनंदन.

Read more...

नवं पुस्तक - रॉ : भारतीय गुप्तचरसंस्थेची गूढगाथा




हे पुस्तक लिहिण्यामागील (दुसरे) कारण होते ते गेल्या काही वर्षांत सातत्याने दिसून येत असलेली आपल्याच नजिकच्या इतिहासाबद्दलची दुर्भावना. आपल्या देशात स्वातंत्र्यानंतरच्या सत्तर वर्षांत काहीच झाले नाही, हे पालुपद सातत्याने कानावर पडत होते. अजूनही पडते. या ‘काहीच झाले नाही’च्या शेरेबाजीमध्ये अर्थातच देशाच्या पाकिस्तानविषयक धोरणांचाही समावेश असतो. आपल्या आंतरराष्ट्रीय धोरणांविषयी तिरस्काराची भावना असते त्यात. हे सारेच निसंशय प्रचारकी आहे. खेद याचा, की अनेकांची त्यावर श्रद्धा आहे. आपण देशाच्या संरक्षणात कमी पडलो, विशेषतः पाकिस्तानपुढे आपण नेहमीच मान तुकवली, शांततावादाने दुबळे केले आपल्याला... हा प्रचार अनेकांना खराच वाटत असतो. ही सर्व टीका काँग्रेसविरोधातील आहे अशी त्यांची भाबडी समजूत असते. वस्तुतः त्या टीका आणि आरोपांतून आपण आपल्याच देशवासीयांनी केलेल्या कामाला बट्टा लावत असतो. आपल्यासमोर हिंदुस्थानच्या फाळणीचा इतिहास सतत उभा केला जातो. परंतु त्यानंतर आपण पाकिस्तानची फाळणी केली हे मात्र कोणाच्याही ध्यानीमनी नसते. आपल्यासमोर पंजाब आणि काश्मीर येथील दहशतवाद असतो. पाकिस्तानात फुटत असलेले बॉम्ब आणि तेथील विविध प्रांतातील स्वतंत्रतावादी चळवळी यांची मात्र आपल्याला माहिती नसते. आपल्या सामर्थ्याबाबत एवढा शंकेखोर असलेला देश जगाच्या पाठीवर दुसरा कोणता नसेल. या शंकांमधून राजकीय लाभ मिळत असेल कोणाला. परंतु त्यातून देशाविषयी विकृत न्यूनगंड निर्माण होत होता......तो न्यूनगंड, त्या शंका परास्त करण्यासाठी रॉसारख्या संस्थांचा इतिहास समोर येणे आवश्यक होते. त्याबाबत इंग्रजीत अलीकडच्या काही वर्षांत पाच-सहा पुस्तके प्रसिद्ध झाली. रॉशी संबंधित असलेल्या अधिका-यांनीच ती लिहिलेली असल्याने त्यांचे मूल्य मोठेच आहे. परंतु एकतर ती संख्या फारच कमी आहे आणि दुसरी बाब म्हणजे काही अपवाद वगळता रॉच्या कारवायांचा एकत्रित इतिहास त्यातून अभावानेच मिळतो. मराठीतून तर तसे लेखनच झालेले नाही. ती कमतरता या पुस्तकातून भरून निघेल असे वाटते...  
 ('मनोगत' मधून.) 

- रवि आमले, मनोविकास प्रकाशन, डिसेंबर २०१८, पाने २९३, किंमत - २९९ रु. 


रॉ पोस्ट्स
(रॉ आणि गुप्तचर यंत्रणा या संदर्भात यापूर्वी लिहिलेले लेख - 

१. हेरस्य कथा रम्यः (सकाळ)

२. रॉ फाईल (लोकसत्ता)

३. रॉ मटेरियल - पडद्यामागचे राजकारण समजून घेण्यासाठी (लोकसत्ता)

४. रॉ आणि पाकिस्तान (लोकसत्ता)

५. काळोखातल्या झुंजारकथा (लोकसत्ता-लोकरंग)

६. पाकिस्तानी पाखंड (लोकसत्ता)

७. दोन हेरांच्या गप्पा... (लोकसत्ता)

८. अजित डोभाल : भारताचे जेम्स बॉण्ड... सुपर स्पाय, इ. इ. (अक्षरनामा)

९. मिशेल नावाचा 'चॉपर' (सकाळ)



Read more...

संतांची फॅक्टरी


Populus vult decipi – ergo decipiatur.t 
(लोकांना स्वत:ला फसवून घ्यायचे असते, म्हणून ते फसले जातात. एक लॅटिन वचन.) 

कोणत्याही राष्ट्राला जगण्यासाठी उद्योगधंदे वगैरे उभारावेच लागतात. व्हॅटिकन हे जगातील सर्वात लहान राष्ट्र. तेथे असे उद्योगधंदे नाहीत. त्यामुळे बहुधा त्यांनी तेथे संतांचे कारखाने काढले आहेत. धर्म हे सार्वकालीन चलनी नाणे आहेच. त्यात हे उत्पादन. या जोरावर व्हॅटिकनचा जागतिक संसार छान चालतो. अलीकडच्या काळात व्हॅटिकनचा हा संतनिर्मितीचा उद्योग चांगलाच वाढल्याचा दिसतो. आकडेवारीत सांगायचे, तर १९७८ ला पोपपदी आलेल्या जॉन पॉल दुसरे यांनी तब्बल ४८२ जणांना संतपद बहाल केले. सध्याचे पोप फ्रान्सिस यांनी तो विक्रम मोडण्याचा चंग बांधल्याचे दिसते. त्यांनी आल्या आल्या ८१३ जणांना घाऊकपणे संतपदी नेऊन बसविले आणि आता भारतरत्न मदर तेरेसा यांचा संतपदाचा मार्ग मोकळा केला आहे.

Read more...

चला, संशयात्मा होऊया..

‘अत्यंत असत्य अशी गोष्ट तुम्ही सातत्याने सांगत राहिलात की हळुहळू लोकांना ती खरी वाटू लागते. लोकांचा त्यावर विश्वास बसतो.’ 
हिटलरचा प्रोपागंडा मंत्री जोसेफ गोबेल्स याचे हे विधान. अनेक ग्रंथांतूनही ते त्याच्या नावावर उद्धृत करण्यात आले आहे. या विधानाची मौज अशी की त्याला हेच विधान तंतोतंत लागू पडते! म्हणजे – गोबेल्सच्या नावावर खपविण्यात येणारे हे विधान त्याचे नाही. मिशिगनमधल्या केविन कॉलेजचे प्रो. रँडल बेटवर्क हे नाझी प्रोपागंडाचे अभ्यासक. त्या विषयावरचे अनेक ग्रंथ त्यांच्या नावावर आहेत. त्यांच्या संशोधनाचा हा निष्कर्ष.

अशा अनेक गोष्टी सांगता येतील. उदाहरणार्थ न्यूटन आणि सफरचंदाची गोष्ट.

Read more...